
दिवसेदिवस सूर्य आग ओकत असून त्याचा फटका ट्रेकर्स तसेच पर्यटकांना बसू लागला आहे. इर्शाळगडावर ट्रेकिंग संपवून खाली उतरत असताना उष्माघातामुळे एक युवक थेट मूर्च्छा येऊन कोसळला. त्याला तातडीने स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले खरे पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रितेश कोणका असे या दुर्दैवी ट्रेकर्स युवकाचे नाव असून उष्माघातामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते. तो डोंबिवलीच्या कोपर परिसरात राहत होता. त्याच्या मृत्यूमुळे कोणका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डोंबिवलीतील साहिल सुर्वे, युगराज चव्हाण, मितेश गुप्ता, देवेश गुप्ता, क्रिश शेठी व रितेश कोणका या तरुणांचा ग्रुप इर्शाळगड येथे ट्रेकिंगसाठी गेला होता. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास परतीचा प्रवास करत असताना रितेश कोणका याला उन्हाचा प्रचंड त्रास झाला. गडावरील तीव्र चढ, फिरणे आणि तीव्र उतार, कडकायचे ऊन तसेच पिण्याच्या पाण्याचीही कमतरता यामुळे रितेश चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. पायाला मार लागल्याने तो किरकोळ जखमी होऊन त्याला चालणे अवघड झाले.
डोलीतून आणले पण…
इर्शाळगडावरील जखमी रितेशला चौक पोलिस तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने डोली करून ठाकूरवाडीत आणण्यात आले, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. पण रितेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रितेश कोणका हा डोंबिवलीच्या एस. आय. कॉलेजमध्ये शिकत होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.





























































