महाराष्ट्रात वाघ सुरक्षित आहेत का…???

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसावरी जोशी,[email protected]

अवनी… धरा… पृथ्वी… किती समर्पक नाव होतं तिचं… कारण खरंच आपली पृथ्वी वाचवण्यामागे… तिचे संतुलन राखण्यामागे तिचा आणि तिच्यासारख्या अनेकांनी या धरेवर पाय रोवून राहणं गरजेचं आहे.

विदर्भातील, यवतमाळ जिह्यातील पांढरकवडा गाव. तेथील छेटेसे अरण्य. आपल्या आईबरोबर अवनी तिथे दोन वर्षांची असताना आली… या पांढरकवडा अरण्यातील अंतर्गत भागात अर्थात कोअर झोनमध्ये अवनीचे वास्तव्य. रुबाबदार देखणी वाघीण. वयाच्या पाचव्या वर्षांपासून तिच्यावर 13 माणसांना मारल्याचा आणि खाल्ल्याचा आरोप. विविध माध्यमांनीही तिचे नामकरण नरभक्षक वाघीण असंच करून टाकलेले. गेले कित्येक दिवस, किंबहुना महिने तिच्याविषयीच्या बातम्यांचे मथळे ‘नरभक्षक वाघिणीचा पांढरकवडा भागात हैदोस! धुमाकूळ’ अशाच भयावह शब्दांनी सजत होते. या सगळय़ा भडक बातम्यांनी, ग्रामस्थांच्या सततच्या आरडाओरडय़ाने सर्वोच्च न्यायालयालाही अवनीच्या विरुद्ध निकाल देण्यास भाग पाडले गेले… आणि आठ दिवसांपूर्वी तिला संपवण्यात आणि तिच्या छोटय़ा बाळांना अक्षरशः पोरकं करण्यातही माणूस या प्राण्याने यश मिळवले आणि या यशाचा आनंद आसुरी पद्धतीने साजराही करण्यात आला.

मी तथाकथित वन्य जीव अभ्यासक नाही, पण आत्यंतिक प्राणीप्रेमी आहे. याच सच्चा भावनेतून अवनीचा अभ्यास करणे आणि तिची खरी बाजू प्रकाशात आणणे खूप गरजेचे वाटले.

अवनी सगळ्या वाघांचे प्रतिनिधित्व करते

आज अवनी आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील वाघांचे प्रतिनिधित्व करते आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. आज ‘वाघ वाचवा… वाघ वाचवा…’ अशा केवळ कागदी योजना केल्या जातात. पण प्रत्यक्षात मात्र वाघाच्या वाटय़ाला येते आहे ते माणसांपासून असणारे भय… असुरक्षितता…

आपला देश हे वाघांचे माहेरघर मानले जाते. आज जगभरातील वाघांच्या तुलनेत सर्वाधिक संख्येने वाघ हिंदुस्थानात आढळतात. महाराष्ट्रातही त्यांची संख्या बऱयापैकी आहे. त्यातील बहुसंख्येने चंद्रपूर जिह्यात आहेत. हिंदुस्थानात जे वाघ आहेत त्यातील बरेचसे संरक्षित क्षेत्राबाहेर आहेत. जर त्यांचं घर हे संरक्षित क्षेत्र असेल तर संरक्षित क्षेत्राबाहेरचं क्षेत्र हे त्यांचं अंगण असतं. याला बफर झोन म्हणतात. या बफर क्षेत्रात मनुष्य वस्ती असते. माणसांच्या अनेक गरजा अरण्याशी निगडीत असतात. त्यात मध, लाकूडफाटा गोळा करण्यापासून विविध प्राणी मारून खाण्यापर्यंत अनेक गोष्टी येतात. या गरजांचा सर्व ताण हे बफर क्षेत्र झेलत असते. वाघांच्या हत्येच्या बहुतेक घटना या बफर क्षेत्रात घडत असतात. बफर क्षेत्रातील वन्यप्राण्यांची देखभाल, त्यांचे संरक्षण वन विभागाकडून योग्य पद्धतीने केले जात नाही. वन्यजीव विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसणे, असले तरी ते प्रशिक्षित नसणे, त्यांच्याकडे आवश्यक ती साधनसामग्री नसणे यामुळे वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि मुख्य म्हणजे वाघ आणि माणूस यांच्यातील संघर्ष टाळण्यात ते अपयशी ठरतात.

माणसांचा हव्यास

माणसांकडून नेहमीच प्रत्येक गोष्टीवर अतिक्रमणच होत असते. अरण्यातील त्याचे अतिक्रमण अनेक गोष्टींच्या हव्यासापायी होते. सांबर, चितळ, हरणाची शिकार, लाकूडफाटा, पक्ष्यांची शिकार, मध… या झाल्या किरकोळ गोष्टी. दुसरा प्रकार वन्यप्राण्यांच्या अस्तित्वावरच घाला घालणारा आहे. वाघाचे कातडे, नखं, अन्य प्राण्यांची शिंगं यांची परदेशात मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाते. वाघाच्या तर अनेक अवयवांना चीन, हाँगकाँगमध्ये मोठी मागणी आहे.

अनेक लाभाच्या गोष्टी

याखेरीज स्थानिक राजकारणी, उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक यांचा अरण्यांच्या क्षेत्रावर तर नेहमीच डोळा असतो. व्यवसायाला जागा, खनिजांच्या खाणी इ. अनेक लाभाच्या गोष्टी अरण्यात अडकलेल्या आहेत.

वाघांचे वसतिस्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिदाट अरण्यात असते. त्यांची शिकारीची पद्धत, सहन न होणारी उष्णता ही त्यामागची कारणं. वाघ साधारणतः राहण्यासाठी मोठी अरण्ये पसंत करतात. पण मानवी अतिक्रमणामुळे अरण्ये लहान झाली आणि वाघाला घरातून अंगणात येणे भाग पडू लागले.

आज हिंदुस्थानात 41 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील वाघांसाठी आणि अभयारण्यांसाठी सुमारे 60 हजार चौरस कि.मी.चे अरण्य राखीव करण्यात आले आहे. पण आता हे क्षेत्रही सुरक्षित राहील की नाही अशी शंका आहे. कारण देशात दरवर्षी 72 लाख हेक्टर एवढे जंगलाचे भूक्षेत्र व्यापार व उद्योगासाठी हस्तांतरीत केले जात आहे. त्याचा परिणाम अरण्यांवर होत आहे. पर्यायाने वाघांच्या संख्येवरही होत आहे. वाघाचे अस्तित्व नाकारून आपल्याला केवळ तोटाच होणार आहे.

वाघ सगळ्यात महत्त्वाचा घटक

संपूर्ण जैवसाखळीतील वाघ हा सगळय़ात महत्त्वाचा घटक आहे. पण आज हा जंगलचा राजा स्वतःच्या घरातच असुरक्षित ठरलाय. तो स्वतःचे संरक्षण करण्यात अपयशी ठरतोय. त्यासाठी त्याला आपणच सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्याच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, पाणी, निवारा आणि संरक्षण. यासाठी नैसर्गिक साखळी टिकवणे गरजेचे आहे. या साखळीत प्रत्येक जिवाचे महत्त्व आहे. वाघ नसतील तर हरणं वाढतील… त्यांचा अरण्यावर ताण येईल, ती शेतीचे नुकसान करतील. आज प्रचंड मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे घरच धोक्यात आलंय. अवनीचा संपूर्ण संघर्ष या गोष्टीचा साक्षीदार आहे.

आपल्या पिलांचे जीवापलीकडे रक्षण करताना अवनीचा जगण्याचा संघर्ष थांबला… तो अनेक अनुत्तरित प्रश्न ठेवून… यापैकी सगळय़ात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या महाराष्ट्रात हा उमदा, देखणा आणि अत्यंत सभ्य प्राणी सुरक्षित आहे…???

या गोष्टी लक्षात घ्या…

वाघ हा आपली जागा धरून राहणारा प्राणी आहे. तो सहसा त्याचे वसतिस्थान सोडत नाही. एकाच रस्त्यावरून जायला त्याला आवडते. तो आपले क्षेत्र खुणांनी आरक्षित करून ठेवतो. त्याच्या वागण्याचे ठरावीक घडय़ाळ असते.

सिंहाप्रमाणे वाघाचे कुटुंब नसते. वाघिणीचे बाळं सांभाळणे, त्यांचे पालनपोषण आणि संरक्षण करणे हे एकल पालकत्वाचे उत्तम उदाहरण आहे.

पिलांची आई असलेली वाघीण जास्त आक्रमक आणि संरक्षक असते.

पिलं जवळपास दोन-अडीच वर्षांची होईपर्यंत आपल्या आईसोबत असतात. त्यांची आई त्यांना शिकार करायला शिकवते. सुरुवातीला अर्धमेल्या शिकारीशी खेळायला शिकवते. नंतर जिवंत सावजांवर हल्ला करण्यास शिकवते. आज अवनीची पिल्लं फक्त 10 महिन्यांची आहेत. ती स्वतःचे पोट भरण्यास पूर्ण असमर्थ आहेत.

 वाघ अत्युच्च दर्जाचा शिकारी असला तरी एक शिकार करण्यासाठी तो कमीतकमी वीस वेळा प्रयत्न करतो. ती शिकार तिच्या कुटुंबाला साधारणतः तीन ते सात दिवस पुरते. वाघिणीला महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार करावी लागते.

‘नरभक्षक वाघीण’ हा अवनीवर विनाकारण बसलेला शिक्का. 13 माणसं मारायला ती काही माणूस नव्हे. मुळात माणूस हे वाघाचे भक्ष्य कधीच नसते. हरणं, चितळं, सांबर हे वाघांचे आवडते खाद्य. माणसावर हल्ला किंवा माणसाची शिकार वाघ दोनच कारणाने करतो. जेव्हा तो अत्यंत वयस्क होऊन त्याच्या हालचालींवर मर्यादा येतात तेव्हा… आणि दुसरे कारण म्हणजे पिलांच्या आणि स्वतःच्या रक्षणार्थ…. पाच वर्षांची अवनी म्हातारी असण्याचा प्रश्नच नव्हता. पिलांचे रक्षण हा तिचा मातृधर्म आहे, होता.

आरोपानुसार 13जणांपैकी फक्त 2 माणसांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यापैकी एकाच्या शरीरावर नर वाघाचा डीएनए सापडला आहे, मग अवनी दोषी कशी ठरते?

सर्वोच्च न्यायालयाने अवनीला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. जेरबंद करणे किंवा मारणे या दोन्ही प्रक्रिया कायद्याने संध्याकाळनंतर होऊ शकत नाहीत. अवनीला रात्री 11.30 वाजता मारण्यात आले. त्यावेळी कोणताही वनाधिकारी बरोबर नव्हता. कायद्याने अशा प्रकरणात फक्त वनाधिकारी हत्यार वापरू शकतो.

 मुळात वाघ हा माणसापासून दूर राहणे पसंत करतो. पण माणूस जंगलात शिरल्यावर, त्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात शिरल्यावर त्याने काय करावे?

आज मानवी अतिक्रमणामुळे अरण्यं आक्रसताहेत. अनेक जंगलांत उन्हाळा, हिवाळा दोन्ही ऋतूंत पाणी नसते. पाणी नसल्यामुळे हिरवळ नसते. मग गवतावर जगणारे प्राणी कमी होतात. शिवाय माणूस त्यांना खाण्यासाठी त्यांची शिकार करतो ते वेगळेच. वनाधिकाऱयांनी वारंवार ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना जंगलापासून सुरक्षित जागी हलवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांचे समुपदेशन करणं गरजेचं आहे.

मुळात गावातील लोकांना त्यांच्या प्रातर्विधीसाठी घरात सोय करून देणं हे शासनाचे कर्तव्य आहे. आपल्या वनातील वाघ हे आपलं वैभव आहे. ते राखायचं की उधळून द्यायचं हे आपण सामान्यांनीच ठरवायला हवे. यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा भाग खूप मोठा असला तरी गावातील लोकांनी थोडा सुज्ञपणा दाखवला तर माणूस आणि वाघ हा संघर्ष टळू शकतो. कोणताही प्राणी हा मुळातच अत्यंत सभ्य असतो. माणूस नामक धोकादायक प्राण्यापासून तो लांब राहणंच पसंत करतो. पण या सभ्यपणाची अपेक्षा माणसांकडून करता येईल का?