आयसीएसईचा दहावीचा निकाल 99.34 तर बारावीचा 96.84 टक्के

452
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा आयसीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात किंचित वाढ झाली आहे. यंदा दहावीचा निकाल 99.34 टक्के तर बारावीचा निकाल 96.84 टक्के इतका लागला आहे. कौन्सिल फार द स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशनने (सीआयसीएसई) शुक्रवारी ऑनलाईन निकाल जाहीर केला. कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही बोर्डाने यंदा जाहीर केलेली नाही.

देशभरातून 2 लाख 7 हजार 902 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यांपैकी 2 लाख 6 हजार 525 विद्यार्थी पास झाले आहे. नापास विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 377 इतकी आहे. तर 85 हजार 611 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यांपैकी 2 हजार 798 विद्यार्थी नापास झाले आहेत. तर 82 हजार 813 जण पास झाले आहेत.

बारावीच्या 8 तर दहावीच्या 6 विषयांची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. या विषयांचे मूल्यांकन पार पडलेल्या तीन परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात आले.
ज्या विद्यार्थ्यांना गुण सुधारायचे असतील, असे विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकतात.
दिल्ली एनसीआर विभागात दहावीचे 5 हजार 118 तर बारावीचे 2 हजार 578 विद्यार्थी पास झाले आहेत.
दहावीसाठी एकूण 61 विषयांची लेखी परीक्षा होती. त्यात 22 हिंदुस्थानी भाषा, 9 परदेशी भाषा होत्या. तर बारावीची एकूण 51 विषयांची परीक्षा होती. त्यात 15 हिंदुस्थानी भाषा तर 6 परदेशी भाषांचा समावेश होता.

महाराष्ट्रात आयसीएसईच्या शाळा वाढल्या; निकालही वाढला
महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल 99.92 टक्के तर बारावीचा निकाल 98.53 टक्के इतका लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल वाढला असला तरी राज्याच्या बारावीच्या निकालात घट झाली आहे. गेल्यावर्षीचा दहावी, बारावीचा निकाल अनुक्रमे 99.85 टक्के आणि 99.27 टक्के इतका लागला होता. आयसीएसई बोर्डाच्या शाळा, काँलेजचे जाळेदेखील झपाटय़ाने वाढत आहे. यंदा दहावी, बारावीच्या शाळांमध्ये अनुक्रमे 18 आणि 7 अशी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी राज्यात दहावीच्या 208 आणि बारावीच्या 44 शाळाच होत्या.

महाराष्ट्राचा निकाल
बोर्ड               शाळांची संख्या      परीक्षा दिलेले विद्यार्थी        पास विद्यार्थी
आयसीएसई          226                   23,336                   23,319
आयएससी             51                     3,150                     3,104

घरबसल्या मिळणार निकालपत्र
‘सीआयसीएसई’ च्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे यंदा घरबसल्या निकालपत्र देण्याची व्यवस्था बोर्डाने केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना डिजी लाँकर (DigiLocker) डाउनलोड करावे लागणार आहे. याद्वारे विद्यार्थी निकालपत्र आणि मायग्रेशन सर्टीफिकेट डाऊनलोड करू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या