इराणच्या आण्विक तळाजवळ इस्रायलचा हल्ला

इराणच्या हल्ल्याच्या 6 दिवसांनंतर आज इस्रायलने प्रत्युत्तर देत इराणचे आण्विक तळ असणारे शहर इस्फहान येथे अनेक ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून हवाई हल्ला केला. इराणच्या हवाई अड्डय़ांवरही हल्ले करण्यात आले. इराक आणि सीरियामध्येही इस्रायलने क्षेपणास्त्रs डागली. इस्रायलने इराणला प्रत्युत्तर दिल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला असून युद्ध आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे.

इराणचे ज्येष्ठ नेते अली खमेनी यांच्या 85 व्या वाढदिवसाला हा हल्ला करण्यात आल्याचे वृत्त इराणच्या फार्स न्यूज एजन्सीने दिले आहे. इस्रायलने मात्र याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. इराणने इस्फहानमध्ये 3 ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.

तेल अवीवची उड्डाणे रद्द

इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी उड्डाणे 30 एप्रिलपर्यंत रद्द केली आहेत. मध्यपूर्वेतील तणावग्रस्त स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

इराणवर निर्बंध लादण्याचा जी 7 राष्ट्रांचा इशारा

जी 7 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्याच्या गटाने इराणवर कडक निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय इस्रायल आणि इराणने शांतता राखावी आणि दोन्ही राष्ट्रांनी युद्धजन्य स्थिती टाळावी असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, इराणच्या हल्ल्याला कुठल्याही प्रकारे उत्तर देऊ, अशी भूमिका इस्रायलने घेतली आहे.