
मिडिल ईस्टमधील तणाव पुन्हा वाढला असून, इस्रायलने लेबनॉनच्या राजधानी बेरूतच्या दक्षिण उपनगरात हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या चीफ ऑफ स्टाफ हैथम तबताबाई याचा खात्मा झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हा हल्ला जूननंतर बेरूतवरील पहिला मोठा हवाई हल्ला असल्याचे सांगितले जाते. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानुसार, या हल्ल्यात पाच जण ठार आणि २५ जण जखमी झाले आहेत.
हैथम तबताबाई हा हिजबुल्लाहचा वरिष्ठ नेता आणि चीफ ऑफ स्टाफ होता. तो इब्राहिम अकील याचा उत्तराधिकारीही होता, ज्याचा सप्टेंबर २०२४ मध्ये इस्रायली हल्ल्यात खात्मा झाला होता. त्या हल्ल्यांमुळे हिजबुल्लाहचे अनेक वरिष्ठ नेते, ज्यात हसन नसरल्लाह याचाही समावेश होता, मारले गेले होते.
तबताबाई हा हिजबुल्लाह संघटनेच्या बहुतेक युनिट्सचे नेतृत्व करत होता. तबताबाई हा इस्रायलविरुद्ध युद्धासाठी तयारी करत होता. अमेरिकेने २०१६ मध्ये त्याला दहशतवादी घोषित केले असून, त्याला सिरिया आणि येमनमधील स्पेशल फोर्सेसचे नेतृत्व करणाऱ्या हिजबुल्लाहच्या असॉल्ट युनिटचे कमांडर म्हटले होते. अमेरिकेने त्याच्याबाबत माहिती देणाऱ्यांसाठी ५ लाख डॉलरांचे बक्षीस जाहीर केले होते.


























































