इस्रायल-हमास युद्धात 53 अब्ज डॉलर्सचे नुकसान

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 50 दिवसांपासून रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत तब्बल 53 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत गाझापट्टीत 14 हजार 800 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून यात मोठय़ा संख्येने महिला आणि मुलांचा समावेश असल्याचा दावा पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने केला आहे. तर हमासने कमीत कमी 28 इस्रायली मुलांची आणि 1 हजार 200 नागरिकांची हत्या केली आहे. दरम्यान, युद्धविरामाच्या पाचव्या दिवशी हमासने आणखी 11 ओलिसांना सोडले, तर इस्रायलने 33 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले.

24 नोव्हेंबर रोजी युद्धविराम जाहीर झाल्यापासून इस्रायलने 150 पॅलेस्टिनी पैद्यांना सोडल्याचा दावा केला आहे. यात मोठय़ा संख्येने महिला आणि मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण इस्रायलच्या ताब्यात होते तर हमासने चौथ्या दिवशी सोडलेले 11 नागरिक द्विराष्ट्र नागरिकत्व असणारे आहेत. यात तीन इस्रायली-फ्रेंच, दोन इस्रायली-जर्मन आणि सहा इस्रायली-अर्जेंटिना यांचा समावेश आहे.

युद्धविरामाचे स्वागत

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम आणखी वाढवण्यात आला. याचे अमेरिकेसमवेत अनेक देशांनी स्वागत केले. संयुक्त राष्ट्र महासचिव अँटेमनियो गुटेरस यांनी दोन्ही देशांचे काwतुक केले. हमासने युद्धविरामाच्या पाचव्या दिवशी 11 ओलिसांना सुखरूप इस्रायली सीमेपर्यंत पोहोचवल्यानंतर इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्याने त्यांना सलाम केला. सर्व ओलिसांची प्रकृती उत्तम असून जोपर्यंत ते त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत इस्रायली सैन्य त्यांच्यासोबत असेल असे प्रवक्त्याने म्हटले आहे.