
सामना ऑनलाईन, कोल्हापूर
कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी आठच्या सुमारास आयकर विभागाने छापा टाकला आहे. घराप्रमाणेच त्यांचा साखर कारखाना आणि पुण्यातील मुलाच्या घरावर देखील छापे पडले आहेत. या छापासत्रामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. मुश्रीफ यांच्या टाकाळा परिसरातील एका नातेवाईकाच्या घरावर देखील छापे मारण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यामध्ये सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ एका जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने एका मंचावर आले होते. यावेळी दोघांमधील खुसखुशीत शाब्दीक जुगलबंदी चांगलीच गाजली होती. दसरा चौकात झालेल्या या कार्यक्रमात पाटील यांनी मुश्रीफांकडे पाहून, ‘अजून वेळ गेलेली नाही भाजपमध्ये या’ असे म्हटले होते. पुढील पाच वर्षात आमचेच सरकार येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आमचे सरकार असेपर्यंत तुम्ही म्हातारे व्हाल. तुमचा अनुभव, तुमच्यातील सहृदयता, रुग्णासाठी केलेली सेवा वृत्ती अद्वितीय आहे. अल्पसंख्याक समाजातील नेता आम्हाला हवा आहे. त्यामुळे तुम्ही भाजपमध्ये याच, असं पाटील यांनी मुश्रीफ यांना उद्देशून म्हटले होते. यावर मुश्रीफ यांनी मी काही पक्षात येणार नाही असं त्याच मंचावरून सांगितलं होतं.






























































