नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती आयकर विभागाला आठ महिने आधीच होती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेत 13,500 कोटींचा घोटाळा केल्याची माहिती इन्कम टॅक्स अर्थात आयकर विभागाला होती. मोदी आणि चोक्सी देशाबाहेर पळून जाण्यापूर्वी आठ महिने आधी तब्बल 10 हजार पानांचा अहवालही आयकर विभागाने तयार केला होता, मात्र याबाबतची माहिती सीबीआय, ईडी या तपास यंत्रणांशी शेअर केली नाही अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील 13,500 कोटी रुपयांचा घोटाळा फेब्रुवारी 2018 रोजी उघडकीस आला, मात्र हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी जानेवारी 2018च्या पहिल्या आठवडय़ातच देशाबाहेर पळून गेले. हिंदुस्थानातील बँकिंग सेक्टरमधील हा सर्वांत मोठा घोटाळा आहे. फेब्रुवारी 2018 नंतर सीबीआय, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाडी टाकल्या. अनेकांची ताब्यात घेऊन चौकशी केली पण आयकर विभागाने आठ महिने आधीच हा घोटाळा उघडकीस आणला असता तर मोदी, चोक्सी देशाबाहेर पळून गेले नसते.

‘आयटी’ विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. मोदी, चोक्सीने घोटाळा केल्याची माहिती केंद्र सरकारला आठ महिने आधीच होती, मग मोदी, चोक्सीला कोणी पळविले
– रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

‘आयटी’ विभागाने काय केले
– आयकर विभागाने (आयटी) जानेवारी 2017 मध्ये नीरव मोदी आणि चोक्सीच्या शोरूम्स, कंपन्या आणि घरांवर धाडी टाकल्या. या दोघांच्या तब्बल 45 ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या.

– नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बनावट कर्ज आणि बनावट खरेदी दाखवून पंजाब नॅशनल बँकेला 13,500 कोटी रुपयांना फसविल्याचे आयकर विभागाच्या लक्षात जानेवारी 2017लाच आले.

– आयकर विभागाने मोदी, चोक्सीच्या घोटाळ्यांविरुद्ध तब्बल 10 हजार पानी अहवाल 8 जून 2017 रोजी तयार केला होता, मात्र हा अहवाल सीबीआय, ईडी, एसएफआयओ, डीआरआय या तपास यंत्रणांसोबत शेअर केलाच नाही. त्यामुळे आठ महिने आधी घोटाळ्याची माहिती असतानाही मोदी, चोक्सी देशाबाहेर पळाले.