
राज्यातील सुमारे साडेनऊशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुमारे दीड लाख जागांसाठी तब्बल दोन लाख 23 हजार 403 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर केले आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा सुमारे एक लाख विद्यार्थ्यांचे अतिरिक्त अर्ज आले आहेत, तर त्याच वेळेस राज्यात शिक्षण शास्त्र्ा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशक्षमतेइतकेही अर्ज उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे हाताला रोजगार मिळवून देणाऱया अभ्यासक्रमाकडेच विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रात ‘आयटीआय’ प्रशिक्षित विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे. एकीकडे आयटीआयमध्ये विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळत असल्याने प्रशिक्षित कर्मचारी वर्ग कंपन्यांना मिळतो, तर दुसरीकडे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना हमखास रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी घेत आहेत.
‘आयटीआय’मध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जात आहे. शिक्षण घेताना आणि घेतल्यानंतर उपलब्ध होणाऱया रोजगाराच्या संधी अनेक असल्यामुळे विद्यार्थ्यांचा ‘आयटीआय’कडे येण्याचा कल वाढत आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज ओळखून विद्यार्थ्यांना ‘आयटीआय’मध्ये प्रशिक्षिण दिले जात आहे. त्यामुळे संबंधित उद्योगांकडून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याशिवाय उच्च शिक्षणाचे मार्गही विद्यार्थ्यांसाठी खुले होतात. म्हणूनच दहावीनंतर ‘आयटीआय’कडे वळणाऱया विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळी प्रवेश क्षमता आहे. अमरावती विभागामध्ये 90 औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून, तिथे 18 हजार 488 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. संभाजीनगर विभागामध्ये 133 औद्योगिक वसाहती असून, 20 हजार 636 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. मुंबई विभागात 107 प्रशिक्षण संस्था असून, 20 हजार 372 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. नागपूर विभागामध्ये 237 औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून, 28 हजार 176 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. नाशिक विभागात 214 प्रशिक्षण संस्था असून, 29 हजार 756 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. पुणे विभागात 191 औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून, 31 हजार 840 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत.
राज्यात एकूण खासगी व शासकीय 972 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्या सर्व संस्थांमध्ये 1 लाख 49 हजार 268 प्रवेश क्षमता आहेत. राज्यात शासकीय आयटीआय 419 प्रशिक्षण संस्था आहेत तिथे 93 हजार 904 प्रवेश क्षमता आहे. तर खासगी आयटीआय 553 प्रशिक्षण संस्था आहेत. एकूण प्रवेश क्षमता 55 हजार 364 इतकी आहे.
डीटीएडकडे दुर्लक्ष
राज्यामध्ये एकीकडे औद्योगिक प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा कल मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. ऑनलाइन स्वरूपातील अर्ज मोठय़ा प्रमाणात प्राप्त झाले आहेत. त्याच वेळेस राज्यात शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश क्षमतेइतकेही अर्ज सादर होऊ शकले नाहीत. आयटीआयसाठी मोठय़ा प्रमाणावर गुणवत्ता प्राप्त करणारे विद्यार्थी प्रवेश घेऊ पाहत आहेत, तर डीटीएडकडे किमान गुणवत्तेचे विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हे चित्र राज्यासाठी चिंताजनक मानले जात आहेत. जे अभ्यासक्रम हाताला काम देऊ शकतील त्याच अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे चित्र समोर आले आहेत. शिक्षक होण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असल्याने शिक्षकांनाच विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे.































































