पूरग्रस्तांसाठी धावले आयटीआयचे विद्यार्थी; महाड, चिपळूणमध्ये इलेक्ट्रिक, प्लंबिंगची विनामूल्य सेवा

रायगड, कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्यापरीने मदत देत आहे. त्यात आयटीआय संस्थांमधील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. आयटीआय संस्थांमधील प्राचार्य, शिक्षकांबरोबर आजी-माजी विद्यार्थ्यांची पथके सध्या रायगडमधील पूरग्रस्तांना इलेक्ट्रिक, प्लंबिंगची विनामूल्य सेवा देत आहेत.

रायगडच्या चिपळूण आणि महाडमध्ये पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांमधील वीज पुरवठा खंडित झाला. इलेक्ट्रिक वायरिंगचे नुकसान झाले. पाण्याच्या मोटारी बिघडल्या. पाइपमध्येही समस्या निर्माण झाल्या. त्याची दुरुस्ती आणि डागडुजी करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली आयटीआय संस्थांमधील पथके प्राचार्य टिकोले आणि कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली रवाना करण्यात आली. आतापर्यंत त्यांनी अनेक घरांमधील इलेक्ट्रिक मीटर्सची दुरुस्ती, वायरिंग केली आहे. फ्रीज व अन्य इलेक्ट्रिक साधनांची दुरुस्तीही करत आहेत. पाण्याच्या बिघडलेल्या मोटारींचीही दुरुस्ती केली जात आहे. पूरग्रस्तांनी त्यांच्या घरामध्ये त्या प्रकारच्या कामाची गरज असेल तर आयटीआयच्या पथकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. सांगली येथेही आयटीआयचे प्राचार्य यतीन पारगावकर यांच्यासह बाळासो मेटकर, संजय यादव हे शिक्षक पूरग्रस्तांना अशा सेवा देत आहेत.

नरेंद्राचार्य महाराज यांच्या मुख्य पीठ नाणीजधाम व उपपीठ मुंबईसह इतर सेवा केंद्रांतील अनेक सेवेकऱयांनी महाड तालुक्याला भेट देत येथील बाजारपेठ, प्रांत कार्यालय, महाड कोर्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चवदार तळे आणि इतर ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. यात मोठय़ा संख्येने सेवेकरी उपस्थित होते.

करी रोड येथील खापरादेव मंडळातर्फे चिपळूण येथे झालेल्या महापुरातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले बॉक्स व स्वच्छता करण्यासाठी लागणाऱया वस्तू मंडळातर्फे देण्यात आल्या. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभागप्रमुख-नगरसेवक मंगेश सातमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अनिल पाटणकर व शाखा क्रमांक 153च्यावतीने जीवनावश्यक सामग्री पाठवण्यात आली. यावेळी चेंबूर विधानसभा संघटक अविनाश राणे, उपविभाग प्रमुख अशोक माहुलकर, शाखाप्रमुख उमेश करवेरा, महिला शाखा संघटक अनिता महाडिक, मीनाक्षी पाटणकर, मारुती वाघमारे, गणेश गायकवाड, विनय साठले, विनय शेटय़े आदी उपस्थित होते.

शिवसेना विभाग क्र. 1 च्या वतीने बोरिवली विधानसभा संघटक प्रीती दांडेकर यांनी आमदार, विभागप्रमुख विलास पोतनीस, विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिक्हिंग ’ ट्रस्टच्या सहकार्याने वैद्यकीय मदत केली. या पथकात हिमांशु मेहता, डॉ. कल्पना गोडबोले, डॉ. नेहा भारद्वाज, डॉ. प्राजक्ता मोरे, नर्सिंग स्टाफ नमिता म्हाप्रळकर, अस्मिता जाधव यांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या