
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
माणूस आपल्या चुकांमधूनच शिकतो. मीदेखील चुकले आहे. राजकारणात प्रवेश करायला मी थोडा उशीरच केला. माझे चुकलेच असे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
अनुभवातून आपल्याला बरेच शिकता येते. आता त्याचा उपयोग मी सध्या करत आहे. काँग्रेसमध्ये सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यास तयार असल्याचे प्रियंका गांधी यांनी लाइव्ह मिंट या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. उत्तर प्रदेशात अनेक जागांवर सक्षम उमेदवार दिले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनीही खूप मेहनत घेतली आहे. प्रत्येकजण पूर्ण सामर्थ्य पणाला लावून निवडणूक लढत असून त्याचे चांगले परिणाम निवडणूक निकालात दिसून येतील असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्र, तामीळनाडू, बिहार या राज्यांमध्ये पक्षाला उभारी आणावी लागेल. त्यासाठी चांगल्या आणि योग्य कार्यकर्त्यांना पुढे आणावे लागेल. या तिन्ही राज्यांत निवडणुकीत चांगली लढत काँग्रेस उमेदवार देत आहेत. ‘न्याय’ योजना शेतकरी आणि गरीबांसाठी खूपच महत्त्वाची असून यातून नक्कीच दिलासा मिळेल असे त्या म्हणाल्या.





























































