
सामना ऑनलाईन । दावोस
उद्योग करताना संकटे येतच राहतील. त्याचा ताण सहन करता येत नसेल तर तुम्ही उद्योग व्यवसाय करायला लायक नाहीत, असे समजावे. पण व्यवसाय-उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर स्मार्ट लोक नोकरीला ठेवा, स्वतःला बदला, भागीदारीत व्यवसाय करू नका, अशी त्रिसूत्री ‘अलीबाबा’ या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष जॅक मा यांनी जागतिक आर्थिक परिषदेत दिली.
- शिक्षक असल्यामुळेच गेली 20 वर्षे मी या व्यवसायात टिकून आहे. शिक्षकाला वाटते की, त्याचे विद्यार्थी त्याच्यापेक्षा स्मार्ट असावेत. शिक्षक हा नेहमीच विद्यार्थ्याला तो जो आहे त्यापेक्षा जास्त चांगले व्हायला मदत करत असतो. पण जर तुम्हाला दुसऱयांना अधिक चांगले व्हायला मदत करता येत नसेल तर स्वतःला बदलले पाहिजे.
- भागीदारीत किंवा मित्राला व्यवसायात सहभागी करून घेत व्यवसाय करू नका. मैत्रीत व्यापार आणि व्यापारात मैत्री आणू नका. मैत्री ही व्यापारापेक्षा जास्त मौल्यवान आहे.
- तुम्ही कोणत्या लोकांना नोकरी देता? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘जे लोक माझ्यापेक्षा स्मार्ट असतात त्यांना मी नोकरी देतो. चार-पाच वर्षांत जे माझे बॉस बनू शकतील, अशा लोकांनाच माझी पहिली पसंती असते. सकारात्मक विचार आणि कधीही हार न पत्करण्याची मनोवृत्ती असल्यांना प्राधान्य देतो.’


























































