जगबुडी आणि नारिंगी नद्यांना पूर; खेडची बाजारपेठ पाण्याखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, खेड

शनिवारी पहाटेपासून खेडमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पूर्वपदावर येऊ पहात असलेले जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. जगबुडी व नारिंगी या दोन्ही नद्यांना आलेल्या पुराचे पाणी बाजारपेठेत घुसल्याने खेड शहराला पुराचा वेढा पडला आहे. जगबुडीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढल्याने पुन्हा एकदा जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत. बोरघर नजीक महामार्गच पाण्याखाली गेल्याने मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. नारिंगी नदीला आलेल्या पुरामुळे खेड-दापोली मार्गही पाण्याखाली गेल्याने खेड-दापोली-मंडणगड मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने खेड तालुक्यातील जनजिवन विस्कळीत झाले होते. जगबुडी नदीचे पाणी पुलापर्यंत पोहोचल्याने सायंकाळी ५ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत जगबुडी पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या चार किलोमिटर्सपर्यत रांगा लागल्या होत्या. गुरुवारी धो-धो कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी सुट्टी घेतली होती. शुक्रवारी दिवसभर पाऊस नव्हता त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येऊ पहात होते. दरम्यान आज पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जगबुडी नदीचे पाणी मासळी मार्केटपासून बाजारपेठेत उसळी मारू लागले. बघता बघता पुराचे पाणी सफा मशिदीजवळ आले आणि व्यापाऱ्यांची धावपळ सुरू झाली. पुराच्या पाण्याने दुकानातील मालाची हानी होऊ नये यासाठी दुकानदारांनी माल सुरक्षित स्थळी हलविण्यात सुरवात केली. दीड वाजण्याच्या सुमारास खेडची मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकात पाणी भरले आणि नागरिकांना २६ जुलै २००५ च्या महापुराची आठवण झाली. नारिंगी नदीचेही पाणी सुर्वे इंजिनिअरिंगकडून बाजारपेठेत घुसले आणि संपुर्ण बाजारपेठेला पुरावा वेढा पडला. मुसळधार पावसामुळे बोरघर नजीकचा महामार्गच पाण्याखाली गेला त्यामुळे सतत धावणाऱया महामार्गाला ब्रेक लागला. काही ठिकाणी नव्याने केल्या जाणाऱ्या रस्त्याची माती वाहून गेल्याने तिथे भगदाडं पडली. काही वाहने पाण्यामध्ये अडकली होती, मात्र तेथील युवकांनी धक्का मारून पाण्यात अडकलेली वाहने पाण्याबाहेर काढली.

खेड शिवतर मार्गावरील क्षेत्रपाल नगर येथे रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद झाला. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यात कोसळलेल्या वृक्ष बाजूला केल्यावर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली. खेड दापोली मार्गावरील नारिंगी नदीचे पाणी आजुबाजूच्या शेतात घुसल्याने हा परिसर पाण्याखाली गेला. काही उत्साही तरुणांनी या पाण्यात होडी उतरवून नौकाविहाराचा आनंद लुटला. बाजारपेठेत पाणी भरायला सुरुवात झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आवश्यकता असेल तर घराबाहेर पडावे असेही नागरिकांना बजावण्यात आले.

नारिंगीला आलेल्या पुरामुळे सुसेरी येथे खेड बहिरवली मार्गही पाण्याखाली गेला त्यामुळे या मार्गावरील वाहतुकही बंद झाली. खाडीपट्ट्यात गेलेले एसटीच्या गाड्याही तिकडेच अडकून पडल्याने एसटीचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे खेड एसटी स्थानकावर प्रवाशांची गर्दी झालेली पहावयास मिळत होती. आज शनिवार असल्याने शाळा, महाविद्यालये सकाळी १०.३० वाजता सुटली होती. मात्र ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याने ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी खेड एसटी स्थानकावरच अडकून पडले होते.