माणुसकीचं टेकऑफ! चार रुग्णांना जीवनदान देण्यासाठी एलायन्स एअरच्या विमानाचे उशिरा उड्डाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका 49 वर्षांच्या महिलेने दान केलेले अवयव विमानतळावर पोचण्यास उशीर झाला. या अवयवांमुळे चार रुग्णांना जीवनदान मिळणार होते. म्हणून एअर इंडियाने मानवतेच्या दृष्टिकोनातून विमान उड्डाण अर्धा तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. अवयव आल्यानंतरच विमानाने झेप घेतली. जयपूर येथे नुकतीच ही घटना घडली. एअर इंडियाने मानवतेच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

एअर इंडियाची सहाय्यक कंपनी एलायन्स एअरलाईन्सच्या जयपूर-दिल्ली विमानाने शनिवारी अर्धा तास उशीरा उड्डाण केले. यामागे कोणतेही तांत्रिक कारण नव्हते. जयपूरवरून दिल्ली येथे ’ह्युमन ऑर्गन’ न्यायचे होते. ते पोचण्यास उशीर झाला, त्यामुळे विमानाने उड्डाण अर्धा तास विलंबाने केले. दिल्ली येथे चार रुग्णांवर ऑर्गन ट्रान्सप्लान्ट शस्त्र्ाक्रिया केली जाणार होती. त्यासाठी मानवी अवयव जयपूर-दिल्ली विमानातून नेले जाणार होते.

प्रवाशांनी दिली साथ

एलायन्स एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार, विमानातून चार अवयव नेण्यात आले. यामध्ये दोन फुफ्फुसे, एक यकृत आणि एक किडनी यांचा समावेश होता. दिल्लीतील चार रुग्णांना या अवयवांची तत्काळ गरज होती. विमानाच्या टेकऑफला का उशीर होत आहे, याचे कारण प्रवाशांना सांगितल्यावर त्यांनीही सहकार्य केले, असे एअरलाईन्सने सांगितले.