सुनेने काढला सासूचा काटा, सापाकडून करवला दंश

2034

राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधात सासू अडसर ठरत असल्याने सुनेने प्रियकराच्या मदतीने तिचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गेल्या वर्षी जुलैमध्ये घडली. सुनेने व तिच्या प्रियकराने सासूच्या अंगावर विषारी साप सोडला. सापाने दंश केल्याने सासूचा जागीच तडफडून मृत्यू झाला. त्यामुळे कोणालाही सुनेवर संशय आला नाही. पण काही दिवसांपूर्वी कोणाशीतरी फोनवर बोलताना सुनेने सापाचा उल्लेख केला आणि त्यानंतर तिचा पर्दाफाश झाला.

झुंझुनू येथील बुहाना मधील सागवा गावात राहणाऱ्या एका तरुणाबरोबर अल्पनाचे लग्न झाले होते. पण त्यांच्यात फार पटत नसे. त्यांच्यात सतत वाद होत असल्याने अल्पनाचा पती व सासरे कामनिमित्त दुसऱ्या गावी राहत. तर अल्पना सासूबरोबर राहायची. याचदरम्यान, अल्पनाचे गावातील मनीष मीना नावाच्या तरुणाबरोबर प्रेमसंबंध जुळले. अल्पना त्याच्याबरोबर तासनतास मोबाईलवर बोलायची. यामुळे सासूला संशय आला. तिने अनेकवेळा याबद्दल अल्पनाला विचारले पण अल्पना काही बाही सांगून विषय टाळायची. यामुळे सासू अल्पनावर चिडायची त्यावरून त्यांच्यात वाद होऊ लागले होते. सासूच्या सततच्या कटकटीचा अल्पनाला कंटाळा आला होता. त्यातूनच अल्पना व मनिषने सासूची हत्या करण्याचा निर्णय घेतला. पण कोणासही संशय येऊ नये म्हणून त्यांनी शक्कल लढवली. मनीषने जयपूरहून एका विषारी साप आणला. त्यानंतर अल्पनाने सासू रात्री गाढ झोपली असता तिच्या अंगावर साप सोडला. सापाने दंश केल्याने सासूचा तडफडून जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अल्पनाने साप घरात घुसला व त्याने सासूला दंश केला. असा आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आईचा साप चावल्याने मृत्यू झाल्याचे अल्पनाच्या पतीला व कुटुंबीयांना खरे वाटले.

त्यानंतर कामासाठी अल्पनाचा पती व सासरे दुसऱ्या गावी परत गेले. पण अल्पना एकटी असल्याने तिची धाकटी जाऊ तिच्याबरोबर राहीली. याचदरम्यान मोबाईल संभाषणावरून अल्पनाचे दुसऱ्या एका व्यक्क्तीबरोबर प्रेमसंबंध असल्याचे तिला समजले. तसेच अल्पनानेच सासूच्या अंगावर साप सोडल्याचेही तिला संभाषणावरून कळाले. यामुळे तिने लगेचच घरच्यांना याबद्दल सांगितले. त्यानंतर अल्पनाला पोलिसांनी अटक केली. तेव्हा अल्पनाने आपला गुन्हा कबूल केला.

आपली प्रतिक्रिया द्या