
सामना ऑनलाईन। जयपूर
लोकसभा निवडणुकीत जबरदस्त पराभव स्वीकारावा लागल्याने राजस्थान काँग्रेसमधील तणाव आणखी वाढला आहे. पक्षाला अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. कारण राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपले पुत्र आणि पक्षाचे जोधपूरमधील उमेदवार वैभव गेहलोत यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी असे वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. सचिन पायलट यांनी त्यांच्या या वक्तव्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे, मात्र आश्चर्यही व्यक्त केले आहे.
एका वृत्तवाहिनीवर मुलाखतीदरम्यान सचिन पायलट यांनीच जोधपूरसाठी वैभव गेहलोत यांचे नाव सुचवले होते याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर पायलट यांनी असेही म्हटले होते की, वैभव प्रचंड मताधिक्याने निवडून येईल. त्यामुळे त्यांनी माझ्या मुलाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारावी असे उत्तर अशोक गेहलोत यांनी दिले. तसेच जोधपूरमध्ये पक्षाच्या झालेल्या पराभवाची संपूर्ण कारणमीमांसा केली जाईल असेही ते म्हणाले. दरम्यान, गेहलोत यांनी मुलाखतीनंतर ट्विटरवरून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे.
पराभवाची जबाबदारी सामूहिक
राजस्थानात जोधपूरमधून काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास पायलट यांना होता. त्यामुळे येथून मी माझ्या मुलाला उभे केले, परंतु राजस्थानातील सर्वच्या सर्व 25 जागा काँग्रेस हरली. त्यामुळे जर कुणी म्हणत असेल की पराभवाची जबाबदारी मुख्यमंत्री किंवा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी घ्यावी तर ते चुकीचे आहे. उलट येथील पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचेही गेहलोत यांनी सांगितले.


























































