सध्याच्या GST सुधारणा अपुर्या, जीएसटी २.० ही मागणी आमची होती, मोदी घेतायत श्रेय; जयराम रमेश म्हणाले…

काँग्रेस पक्षाने रविवारी पंतप्रधान मोदींवर जीएसटी २.० चे पूर्ण श्रेय घेतल्याचा आरोप केला. काँग्रेसने दावा केला की, जुलै २०१७ पासून पक्ष जीएसटी २.० ची मागणी करत होता, परंतु पंतप्रधान मोदींनी या सुधारणांचे पूर्ण श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी यांनी आज राष्ट्राला संबोधित करताना जीएसटी बाबत केलेल्या वाक्व्यावरून काँग्रेसने हे आरोप केले आहेत.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सध्याच्या जीएसटी सुधारणा अपुर्या असल्याचं म्हटलं आहे. X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “आज राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जीएसटी कौन्सिलने केलेल्या सुधारणांचे संपूर्ण श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, जी एक संवैधानिक संस्था आहे.”

जयराम रमेश यांनी जीएसटीमधील अनेक त्रुटींवर बोट ठेवलं. यामध्ये अनेक कर स्लॅब, सामान्य उपभोगाच्या वस्तूंवरील जाचक कर दर, मोठ्या प्रमाणावर करचोरी आणि चुकीचे वर्गीकरण आणि उलट्या शुल्क रचनेचा (जिथे इनपुटच्या तुलनेत आउटपुटवर कमी कर लागतो) समावेश आहे. काँग्रेसने जुलै २०१७ पासूनच जीएसटी २.० ची मागणी केली होती, जी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या ‘न्याय पत्रा’तही प्रमुख वचन होती.

जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित करत म्हटलं आहे की, आठ वर्षांच्या विलंबाने आलेल्या या जीएसटी सुधारणांमुळे खरंच खासगी गुंतवणूक वाढेल का, जी उच्च जीडीपी वाढीसाठी आवश्यक आहे. त्यांनी चिंता व्यक्त केली की, गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थानचा चीनसोबतची व्यापारी तूट दुप्पट होऊन 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाली आहे.