
जालना जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यवाहीचा धडाकाच लावला असून आज 31 मे रोजी पुन्हा वाळुची वाहतुक करणाऱ्याकडून 17 हजाराची फोन-पे व्दारे लाच स्विकारतांना पकडल्याने या दोन्ही तलाठ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मौजे उमरखेडाचे तलाठी अक्षय भुरेवाल व मंगरुळचे तलाठी मंगेश लोखंडे असे या तलाठ्याचे नावे आहेत.
तक्रारदार हे त्यांच्याकडील सहा चाकी गाडीने वाळू, मुरुम व खडी वाहतुक करतात, 29 मे रोजी तक्रारदार हे मंठा तालुक्यातील कोकरसा पाटीजवळून त्यांच्या गाडीने वाळु घेवून जात असतांना कोकरसा पाटीजवळ ड्युटीकामी असलेले मौजे उमरखेडचे तलाठी अक्षय भुरेवाल व मौजे मंगरुळ सजाचे तलाठी मंगेश लोखंडे यांनी तक्रारदार यांची गाडी अडवून तुझ्याकडे असलेल्या पावतीमध्ये खाडाखोड आहे, ती चालणार नाही, तुझ्यावर कारवाई करावी लागेल, असे म्हणून 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 30 हजार रुपयांची ठरवली. त्यापैकी तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपये नगदी घेतले व 8 हजार रुपये फोन पे व्दारे घेतले. त्यानंतर उर्वरित पैसे उद्या आणून दे, असे सांगितले. सदर कामासाठी तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली.
या तक्रारीवरुन आज 31 मे रोजी लाच मागणीबाबत पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या गाडीवर कार्यवाही न करण्यासाठी तलाठी अक्षय भुरेवाल, तलाठी मंगेश लोखंडे यांनी संगनमताने राहिलेले 17 हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली. ती तलाठी भुरेवाल यांच्या फोन पे वर टाकायचे सांगून ती फोन पे व्दारे स्विकारल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन आरोपी तलाठी भुरेवाल यांना वैभव कॉलनी, जालना येथून व तलाठी मंगेश लोखंडे यांना त्यांचे कार्यालय घारे कॉलनी, मंठा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे.
तलाठी अक्षय गणेश भुरेवाल आणि तलाठी मंगेश शंकर लोखंडे यांच्या विरोधात मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधिक्षक सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.एम. मुटेकर व अंमलदार ज्ञानदेव जुंबड, मनोहर खंडागळे, शिवाजी जमधडे, गजानन घायवट, गणेश बुजाडे, कृष्णा देठे व चालक प्रविण खंदारे यांनी पार पाडली.






























































