जळगाव जिल्ह्यात चार चिमुकल्यांची हत्या! साखरझोपेतच कुऱ्हाडीचे घाव घातले

जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा रस्त्यावर शुक्रवारी पहाटे भयंकर थरार घडला. साखरझोपेत असलेल्या चार चिमुकल्यांची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्दयपणे हत्या करण्यात आली. मृतांत दोन मुले, दोन मुलींचा समावेश आहे. घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. पाच वर्षांपूर्वी झालेल्या भादली हत्याकांडाच्या आठवणीने जिल्ह्याचा थरकाप उडाला. घटनेच्या तपासासाठी एसआयटीचे पथक स्थापन करण्यात आले आहे.

रावेर तालुक्यात बोरखेडा रस्त्यावर शेख मुस्तफा यांची शेती आहे. या शेतावर मेहताब गुलाब भिलाला हा रखवालदार म्हणून काम करतो. पत्नी व पाच मुलांसह तो शेतावरच वस्ती करून आहे. मेहताब हा गुरुवारी नातलगाचे निधन झाल्यामुळे पत्नी व थोरल्या मुलगा संजयसह मध्यप्रदेशात खरगोन जिल्ह्यात गढी या मूळगावी गेला होता. सविता (14), राहुल (11), अनिल (8) आणि सुमन (5) ही मुले शेतावरच होती. चौघेही साखरझोपेत असतानाच अज्ञात मारेकऱ्याने कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. सकाळी शेतमालक शेख मुस्तफा हे शेतात आल्यानंतर चौघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. हे भयंकर दृश्य पाहून मुस्तफा हादरून गेले. त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलीस निरीक्षक शीतलपुमार नाईक यांनी मुस्तफा यांच्या शेतात धाव घेतली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हेदेखील घटनास्थळी हजर झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगावला पाठवण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली.

तपासासाठी पथक बनवणार
हत्याकांडाच्या तपासासाठी पथक नेमण्यात आले असून त्याची जबाबदारी सहायक पोलीस अधीक्षक पुमार चिंथा यांच्याकडे देण्यात आली आहे. पोलिसांकडून संबंधित पुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी तपासासाठी एसआयटीसह चार वेगवेगळी पथके तयार केली असल्याचे ते म्हणाले.

हाथरसची पुनरावृत्ती झाल्याचा संशय
गिरीश महाजन यांनी हाथरस प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून चिमुकल्यांचे मारेकरी शोधावेत अशी मागणीही त्यांनी केली. आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, योगिराज पाटील, सुधाकर महाजन, अविनाश पाटील, बंटी महाजन, राकेश घोरपडे आदींनी घटनास्थळी भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या