कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेले परिसर सील करा, जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचा दर वाढत असुन वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढवत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेले परिसर सील करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने आज 15 मे रोजी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगांवकर, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले,डॉ. संजय जगताप, अन्न व औषध विभागाच्या अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचा दर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्युही होत आहे. जिल्ह्यात वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याबरोबरच बाधित रुग्णांच्या सहवासितांचा अचुकपणे शोध घेण्यात यावा. ज्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत असे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरणारे परिसर पत्रे ठोकून सील करण्यात यावेत. तसेच डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसमवेत त्यांचे नातेवाईक थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. प्रत्येक कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड केअर सेंटरवर नियुक्त करण्यात आलेल्या पोलीसांनी अधिक दक्ष राहण्याच्या सूचना करत खासगी रुग्णालतसुद्धा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.

यावर्षी मान्सून वेळेत दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले असून या काळात जिल्ह्यात अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर तसेच कोविड केअर सेन्टरमध्ये कुठेही पाण्याची गळती होणार नाही तसेच पाणी साचणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना पूर्वीच करण्यात याव्यात. अधिक पाऊस तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे प्रत्येक डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेन्टरमध्ये वीज पुरवठा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी जनरेटरचीसुविधा उपलब्ध करून घेण्यात यावी. तसेच कुठल्याही प्रकारचे शॉटसर्किट होऊ नये यासाठी इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करून घेण्यात यावे. एखाद्या ठिकाणी अधिक प्रमाणात पाऊस झाला व रुग्णांना हलवण्याची वेळ आलीच तर अशा प्रसंगी पर्यायी व्यवस्था आधीच तयार ठेवण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.

म्युकर मायकोसिस आजार झालेल्या रुग्ण सध्या आढळत असून या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबत जनमाणसामध्ये जाहिरात फलकाच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांशी डॉक्टरांनी फोनद्वारे संवाद साधुन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दरदिवशी जाणुन घेऊन त्यांना उपचाराच्या संदर्भाने आवश्यक ते मार्गदर्शन करण्याबरोबरच ज्यांना त्रास असेल अश्यांना तातडीने कोविड केअर सेन्टरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.