
जालन्यातील अंबड तालुक्यातील पारनेर फाटा येथे 18 वर्षीय तरुणाची पोटात चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पवन संतोष बोराटे (वय 18) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आरोपी राहुल खरे याला अटक केली.
शनिवारी रात्रीच्या सुमारास पारनेर फाटा येथे पवन संतोष बोराटे (रा. पारनेर) आणि संशयित आरोपी राहुल उध्दव खरे (रा. पारनेर ता. अंबड) यांच्यात वाद झाला. हा वाद आरोपीच्या बहिणीला पवनने दिलेल्या एका चिठ्ठीवरून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक घटनेत झाले.
रागाच्या भरात आरोपी राहुल खरे याने पवन बोराटे यास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर हत्या करण्याच्या उद्देशाने आरोपीने पवनच्या पोटात चाकूने दोन गंभीर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात पवन गंभीर जखमी झाला. रक्तस्त्राव होत असल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच पवनचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी मयत पवनचे वडील संतोष बबनराव बोराटे (वय 45) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी राहुल खरे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ हालचाली करत संशयित आरोपी राहुल खरे यास ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

























































