
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका उसाबरोबरच मोसंबीचा पुरवठादार म्हणून अलीकडच्या काळात नावारूपाला येऊ लागला असतांना कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी सुलतानी अशा तिहेरी संकटात सतत सापडल्याने शेती व पिकांचे मोठे नुकसान होऊन त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना हळूहळू बसू लागला आहे. बागायती पिकांबरोबर हंगामी पिके घेणारे शेतकरीही यामुळे हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात तीर्थपुरी परिसरातील रामसगाव, बानेगाव, भोगगाव, मंगरूळ, हिवरा, भायगव्हाण, जोगलादेवी, मुरमा, भार्डी, दैठणा, खालापुरी, अंतरवाली टेंभी, कोठी, मुद्रेगाव, कंडारी इत्यादी गाव परिसरात गोदावरी नदी व जायकवाडी डाव्या कालव्याच्या मुबलक पाण्यामुळे बहुतांश शेतशिवार बागायती झाले आहे. शेतीला जोडधंदा तसेच नगदी पीक म्हणून अनेक शेतकरयांनी मोसंबीच्या फळबागा फुलवल्या आहेत. परंतु अलीकडच्या काळात हवामान बदलामुळे फळबागा जपण्यासाठी महागडी खते,औषधीची फवारणी करूनही हातात काहीच पडत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यंदा मोसंबीची मोठ्याप्रमाणात फळगळती होत असून बाजारात भावही कमी मिळत असल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नैराश्याने ग्रासले आहे.
अनेक वर्षांपासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मोसंबीच्या बागांवर नाविलाजाने कुऱ्हाड चालवून बागा तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तीर्थपुरी येथील हरिनारायन तेलगड या शेतकऱ्याने पाच वर्षांपूर्वी आपल्या तीन एकर क्षेत्रात मोसंबीची झाडे लावली होती. चार वर्षानंतर झाडांना फळधारणा होऊ लागली, सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात फळ लागली होती. झाडे मोठी झाल्यावर चांगले उत्पादन येईल अशी ते अपेक्षा धरून होते. यंदा फळधारणा चांगली झाली होती. परंतु बाजारात भाव मिळत नसल्याने आणि केलेला खर्च ही निघत नसल्याने त्यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रातील 500 झाडे जेसीबीच्या साहाय्याने उपटून टाकली आहेत. शासनाने फळबागायतदार शेतकऱ्यांना तातडीची भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी हरिनारायन तेलगड यांच्यासह मोसंबी उत्पादक शेतकऱ्यातून होत आहे.




























































