
जलयुक्त शिवार योजनेमध्ये झालेल्या साडेसहा लाख कामांपैकी 950 कामांविषयी तक्रार आहे. ही संख्या फार मोठी नाही. वास्तविक कोणत्याही कामात चूक होऊ नये. तरीही जलयुक्त शिवारच्या कामात चूक झाली असेल तर त्याची चौकशी करण्यात अडचण नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.
जलयुक्त शिवार योजनेतील 900 कामांची एसीबीमार्फत चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे सरकार असताना आम्ही जलयुक्तच्या 650 कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, या योजनेच्या संदर्भात सरकारला जी चौकशी करायची असेल ती त्यांनी निश्चितपणे करावी.
सर्वाधिकार जिल्हाधिकाऱयांना जलयुक्त शिवार योजनेचे सर्वाधिकार
जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले होते. या योजनेचे काम कृषी, जलसंधारण, ग्रामविकास, लघू पाटबंधारे, जिल्हा परिषद अशा सात विभागांच्या माध्यमातून झाले. योजनेचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला जात होता आणि तेथूनच त्याचे वितरण होत होते, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

























































