
समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जांबसमर्थ येथील राममंदिरातून राम, सीता, लक्ष्मण, हनुमंत, जांबुवंत आदी देवतांच्या सहा पुरातन मूर्तींच्या चोरीचा 72 तास उलटूनही अद्याप छडा लागला नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. `जोपर्यंत आम्हाला आमचे श्रीराम मिळणार नाही, तोपर्यंत गावात एकही चूल पेटणार नाही अन् आम्हीदेखील येथून हलणार नाही, असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी मंदिरासमोरच काल सकाळपासून अन्नत्याग आंदोलन केले. भूषणगडावरील भूषण स्वामी यांचीदेखील यावेळी उपस्थिती होती. त्यांनीही पुरातन मूर्ती चोरीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली असून, लवकरच छडा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ हे समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असून, गावातील पुरातन श्रीराम मंदिरातील स्वामींच्या वडिलोपार्जित श्रीरामसह अन्य देवी-देवतांच्या ऐतिहासिक पुरातन मूर्तींची २२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास चोरी झाली. विशेष म्हणजे चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी, चांदीच्या इतर मूर्तींना हात न लावता फक्त पंचधातूंच्याच मूर्ती चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. घटनेच्या 72 तासांनंतरही कोणताही सुगावा न लागल्याने ग्रामस्थांसह समर्थ भक्तांनी मंदिरासमोर टाळ – मृदंगांच्या गजरात एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करून यंत्रणेचे लक्ष वेधले. आंदोलनस्थळी घनसावंगीचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.
दरम्यान, सुरुवातीला गावच्या वेशीवरील मारुती मंदिरासमोर ग्रामस्थांनी टाळ-मृदंगांच्या गजरात भजन म्हणत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. त्यानंतर आंदोलक श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचले आणि तिथे त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान, ग्रामस्थांनी एकच दिवस लाक्षणिक उपोषण करावे, असे आवाहन समर्थ रामदास स्वामींचे अकरावे वंशज भूषण स्वामी यांनी केले. परंतु, आम्हाला आमचे श्रीराम मिळत नाही, तोपर्यंत गावात एकही चूल पेटणार नाही, येत्या दोन दिवसांत सर्व मूर्तींचा शोध लागला पाहिजे, असा इशाराच ग्रामस्थांनी यावेळी बोलतांना दिला.
घटनेचा तपास सुरू आहे
जांबसमर्थ येथील घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेसह वरिष्ठ पातळीवर तपास सुरू आहे. मात्र, चोरीचा धागादोरा अद्याप सापडलेले नाही. लवकर शोध लावला जाईल, असे घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले.
शिवसेना तीव्र आंदोलन करणार – सहसंपर्कप्रमुख चोथे
जांबसमर्थ येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून, पोलिसांना तपास लागलेला नाही. पोलीस प्रशासनाने येत्या दोन दिवसांत मूर्तींचा शोध घ्यावा; अन्यथा परिसरातील नागरिकांना घेऊन शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जालना जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे यांनी दिला आहे.

































































