जामखेडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा पाचजणांवर हल्ला

जामखेड शहरातील तपनेश्वर नुरानी गल्लीजवळ एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून, त्याने मुलांना लक्ष्य केले आहे. या कुत्र्याने पाच ते सहाजणांना चावा घेतल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येकडे नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

जामखेड येथील तपनेश्वर रोड भागातील जाबीर तांबोळी यांचा मुलगा ओ. एस. जाबीर तांबोळी (वय 8) हा रविवारी दुपारी घराजवळ खेळत होता. त्यावेळी मागून आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक हल्ला झाल्याने काही कळण्याआधीच कुत्र्याने ओएसच्या तोंडावर चावा घेतला. दुसऱया एका मुलाच्या हाताच्या बोटाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. या दोन मुलांना जामखेड खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचार करून अहिल्यानगर सरकारी जिल्हा रुग्णालयात येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तपनेश्वर याच परिसरातील आणखी पाच ते सहाजणांना कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे जामखेड नगरपरिषद प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

जामखेड शहर व परिसरात मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. यामुळे रस्त्यांवरून प्रवास करताना स्थानिक नागरिक, वाहनचालक, लहान मुले तसेच शालेय विद्यार्थी आदींचा प्रवास धोकादायक झाला आहे. शहरात मोकाट श्वानांनी उच्छाद मांडला असून, नगरपरिषदेने कुत्र्यांना वेळीच बंदिस्त करणे गरजेचे आहे.

– संतोष नवलाखा, तालुकाध्यक्ष, आम आदमी पार्टी.