
सामना प्रतिनिधी। जामखेड
सततचा दुष्काळ, नापिकी यामुळे वाढत जाणारे कर्ज या कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील साकत येथील चंद्रकांत शंकर अडसुळ ( 55 ) या शेतकर्याने बुधवारी सकाळी शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अडसुळ यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा व विवाहित मुली असा परिवार आहे.
चंद्रकांत अडसुळ हे बर्याच दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. शेतातून अत्यल्प उत्पन्न मिळत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती . यातच दोन वर्षापुर्वी मुलीच्या लग्नासाठी खाजगी सावकाराकडून त्यांनी कर्ज घेतले होते. पण दोन वर्षापासून दुष्काळामुळे ते कर्ज फेडू शकले नाहीत. याचाही तणाव त्यांच्या मनावर होता. तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया व सेवा संस्थेचे कर्जही त्याच्याकडे असल्याचे कळते. वाढत जाणारा कर्जाचा डोंगर सततची नापिकी या मानसिक तणावाखाली ते काही दिवसांपासून होते. यातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असे बोलले जात आहे.
बुधवारी सकाळी ते शेतातून दुध घेऊन घरी आले. आंघोळ केल्यानंतर शेतात जातो असे सांगून ते घराबाहेर पडले. पण तिथे गेल्यावर त्यांनी गोठ्यातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.





























































