
कोल्हापूरच्या महालक्ष्मी व ज्योतिबा मंदिरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जॅमर बसवला जाणार आहे. चेहरे टिपणारे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत, असे प्रतिज्ञापत्र मंदिर समितीने उच्च न्यायालयात सादर केले आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात 107 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विमानतळावरील तंत्रज्ञानाप्रमाणे मंदिरात येणाऱया भाविकांच्या सामानाची तपासणी केली जाते. त्यामुळे मंदिर परिसरातील चोरीचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावा प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.
मंदिरात सध्या सुरक्षारक्षक आहेत. त्यांचे काम भाविकांवर लक्ष ठेवणे व रांगेचे नियोजन करणे आहे. त्यांना कामावरून न काढता अतिरिक्त शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक केली तर समितीवर आर्थिक बोजा वाढेल, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करू द्या
मंदिरात येणाऱया भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर समितीने उपाययोजना केल्या आहेत. येथे प्रशिक्षित शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. या नेमणुकीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवावी, अशी विनंती समितीने प्रतिज्ञापत्राद्वारे केली आहे. मात्र न्यायालयाने ही स्थगिती उठवण्यास नकार दिला व ही सुनावणी 20 डिसेंबर 2023 पर्यंत तहकूब केली.
काय आहे प्रकरण
महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक व जनरल कामगार युनियनचे रक्षक या दोन मंदिरांच्या सेवेत 2016पासून आहेत. महालक्ष्मी मंदिरात 49 तर ज्योतिबा मंदिरात 10 रक्षक आहेत. या सुरक्षारक्षकांना काढून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक मंदिर ट्रस्टला करायची आहे. तसे पत्र त्यांनी दिले. याविरोधात या सुरक्षारक्षकांनी ऍड. अविनाश बेळगे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या सुरक्षा रक्षकांना कामावरून काढण्याचे आदेश न्यायालयाने रद्द करावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

























































