
कुलगाम येथे सीआरपीएफ जवानांवर अतिरेक्यांनी बुधवारी दहशतवादी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा श्रीनगरमधील सीआरपीएफच्या बटालियनवर अतिरेक्यांनी ग्रेनेडहल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे सहा जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
करन नगर येथे सीआरपीएफ 144 बटालियनची तुकडी तपासणी नाक्यावर तैनात असतानाच अतिरेक्यांनी सायंकाळी जवानांच्या दिशेने ग्रेनेड भिरकावला. स्फोट होताच परिसरात गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी जवानांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या तसेच अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली. आठवडाभरातील हा दुसरा गेनेडहल्ला असून बुधवारी अशाच प्रकारचा गेनेडहल्ला सीआरपीएफच्या जवानांवर करण्यात आला होता. त्यात एक जवान जखमी झाला होता.
























































