
जम्मूमध्ये पावसाचे थैमान सुरुच आहे. पावसामुळे मंगळवारी माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर अर्धकुंवारीजवळ दरड कोसळली. डोंगरावरून मातीच्या ढिगाऱ्यासह मोठे दगड खाली कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना कटरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दुर्घटनेनंतर तात्काळ मंदिर समिती आणि सुरक्षा दलांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. दोरी आणि बॅरिकेडिंगच्या मदतीने भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांसह, एनडीआरएफ टीम देखील घटनास्थळी उपस्थित आहे. दुसरीकडे जम्मू शहरातील सुंजवान भागात पुराचे पाणी शिरले आहे.
वैष्णोदेवी यात्रा स्थगित
भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, माता वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. अर्धकुंभरी ते भवन हा मार्ग बंद करण्यात आला आहे. यात्रेत असलेल्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद आहेत.
शाळांमध्ये सुट्टी जाहीर
सततचा पाऊस, पूर, भूस्खलनाच्या घटनांमुळे जम्मू विभागातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा 27 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. जम्मू आणि कश्मीर शालेय शिक्षण मंडळाने बुधवारी होणाऱ्या दहावी आणि अकरावीच्या परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद
डोडा येथे ढगफुटीमुळे 10हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. रामबन जिल्ह्यात काही ठिकाणी टेकड्यांवरून दगड पडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी सकाळी 250 किमी लांबीच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.