
प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. बिल्लावार परिसरातील भातोडी आणि मुआर भागात शुक्रवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर गोळीबार केला. लष्करानेही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. गोळीबाराच्या घटनेनंतर जवानांनी परिसराला घेराव घालता असून दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, बटोद पंचायतमधील तात्पुरत्या लष्करी छावणीच्या संतरी चौकीवर मध्यरात्री 1.20 वाजता संशयास्पद दहशतवादी हालचाली आढळल्या. यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
गोळीबारानंतर सैन्यानेही प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी सुमारे अर्धा तास गोळीबार सुरू होता. सुदैवाने, या घटनेत कोणताही सैनिक जखमी झाल्याची माहिती नाही. गोळीबारानंतर दहशतवादी जंगलात पळून गेले.