Pahalgam Terror Attack – काश्मीर हादरले! दहशतवाद्यांचा पर्यटकांवर बेछूट गोळीबार, एकाचा मृत्यू; 12 जखमी

जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला तर 12 पर्यटक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबादारी पाकिस्तानच्या लश्कर ए तोयबाची सहसंघटना असलेल्या टीआरएफने घेतली आहे. हल्ल्यानंतर आजुबाजूच्या भागात जवानांनी शोधमोहिम सुरू केली आहे.

पहलगाममधील बैसारन पर्वतावर ट्रेकिंगसाठी काही पर्यटक गेले होते. त्यावेळी तीन दहशतवादी हातात बंदूक घेऊन आले व त्यातील एकाने एका तरुणाला नाव विचारले. त्याने नाव सांगताच त्या तरुणाने त्याच्यावर गोळीबार केला. त्यामुळे पर्यटक सैरावैरा पळू लागले. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 12 पर्यटक जखमी झाले.

हिंदू असल्याने मारल्याचा पीडितांचा दावा

हल्ल्यानंतर पर्यंटकांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी एका तरुणाला त्याचे नाव विचारले. तो हिंदू असल्याचे समजल्यानंतर दहशतवाद्यांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले.