आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा! जळगावातून 18 जुलैपासून धडाका

95

सामना ऑनलाईन, मुंबई

लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी व ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्या मतदारराजाचे मन जिंकण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी शिवसेना नेते व युवासेवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला 18 जुलैपासून जळगावातून मोठय़ा धडाक्यात शुभारंभ होत आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे हे समाजाच्या प्रत्येक घटकाशी, युवाशक्तीशी ‘आदित्य संवाद’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या ‘जनआशीर्वाद यात्रे’च्या माध्यमातून आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे 18 ते 22 जुलै या काळात ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी शिवसेना भवन येथे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. या दौऱ्याची माहिती देताना सरदेसाई म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत  शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळाले. शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मोठा वाटा होता. शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या  ज्या  जागा लढवल्या त्या प्रत्येक जागेवर आदित्य ठाकरे यांनी किमान दोन ठिकाणी कार्यकर्ता मेळावा, जाहीर सभा, प्रतिष्ठतांच्या भेटीगाठी आणि आदित्य संवादच्या माध्यमातून युवा पिढीला जोडण्याचे काम केले होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना सुचवले होते की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या प्रत्येक जिह्यात व प्रत्येक तालुक्यात जाऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी आणि समाजातल्या प्रत्येक घटकाशी संवाद साधला पाहिजे. म्हणूनच आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून जनआशीर्वाद यात्रा आयोजित केली आहे अशी माहिती वरुण सरदेसाई यांनी यावेळी दिली.

कार्यकर्ता मेळावे ते आदित्य संवाद

या यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्ता मेळावे, जाहीर सभा, प्रतिष्ठत व्यक्तींच्या भेटीगाठी, आदित्य संवाद अशा वेगवेगळय़ा कार्यक्रमाच्या माधमातून यात्रा पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले, युवासेनेचे योगेश कदम, अमोल कीर्तीकर, नगरसेवक राहुल कनाल यांच्यासह युवासेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय उद्धव ठाकरे घेतील

आदित्य ठाकरे हे मागील दहा वर्षे युवासेनेच्या माध्यमातून नेतृत्व करीत आहेत. या काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. अगदी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत शिवसेनेचे ज्या ठिकाणी उमेदवार निवडणूक रिंगणात असतात त्या ठिकाणी त्यांनी प्रचार केला आहे. त्यांनी ज्या ठिकाणी प्रचार केला त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय हा निश्चित होतो असे आढळून आले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढल्यावर शिवसेनेला विजय प्राप्त होईल असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटते आणि मुख्यमंत्रीपदाबाबत सर्व निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतात. पण सध्या तरी आमच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांचे एकच ध्येय आहे की, जनआशीर्वाद यात्रा यशस्वी करायची आहे असे वरुण सरदेसाई म्हणाले.

यात्रेचे घोषवाक्य

या यात्रेच्या घोषवाक्याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेना-भाजप महायुतीला मतदान केले त्या मतदारांचे आभार मानायचे व ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्या मतदारांची मने जिंकायची असे घोषवाक्य घेऊन आम्ही जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत. जनआशीर्वाद यात्रा सुमारे चार हजार किमीचा प्रवास करणार आहे.

शिवसेना 365 दिवस कार्यरत

आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार यानिमित्ताने सुरू होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला त्यावर शिवसेना 365 दिवस कार्यरत असते. प्रचार व प्रसार सुरूच असतो आणि त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळाले.

जळगावमधून प्रारंभ

या जनआशीर्वाद यात्रेचा येत्या 18 जुलैपासून जळगावमधून शुभारंभ होत आहे. सर्वात पहिला टप्पा 18 ते 22 जुलै या काळात होणार आहे. या यात्रेच्या काळात आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते, उपनेते, आमदार, खासदार, युवासेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र पिंजून काढतील. या यात्रेचा पहिला टप्पा पार पडल्यावर लगेचच पुढील टप्प्याचे नियोजन जाहीर करण्यात येतील.

जळगावमधून यात्रा का?

जनआशीर्वाद यात्रा जळगावमधूनच का सुरू केली, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून शिवसेनेला प्रचंड यश मिळेल अशी आम्ही अपेक्षा करीत आहोत. त्यामुळे या यात्रेची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करावी असे शिवसेनेच्या प्लॅनिंग कमिटीने ठरवले. म्हणून जळगावमधून सुरुवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या