नव्या जबाबदारीसह बुमरा आयर्लंडला

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा जवळपास वर्षभरानंतर हिंदुस्थानी संघात पुनरागमन करतोय, पण त्याचे पुनरागमन हिंद्स्थानी संघाचा कर्णधार म्हणून होतेय. पाठीच्या दुखापतीतून सावरलेला बुमरा आगामी आयर्लंड दौऱयात कर्णधारपदाच्या जबाबदारीसह गोलंदाजी करणार आहे. मंगळवारी बुमरासह हिंदुस्थानी संघ आयर्लंडला रवाना झाला. त्यावेळी बीसीसीआयने ट्विटरवर बुमरासह अन्य खेळाडूंचे छायाचित्र पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

29 वर्षीय बुमरा गतवर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे त्याला टी-20 विश्वचषक, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांना मुकावे लागले होते. मार्च महिन्यात बुमराच्या पाठीवर न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर संघात पुनरागमन करण्यासाठी त्याला तब्बत पाच महिने प्रचंड मेहनत घ्यावी लागली.

एकाच मैदानावर तीन सामने

हिंदुस्थानचा संघ या छोटेखानी दौऱयात तीन टी-20 सामने खेळणार आहे. 18 ऑगस्टला पहिला सामना खेळला जाणार असून दुसरा 20 ऑगस्टला आणि तिसरा 23 ऑगस्टला खेळला जाईल. हे तिन्ही सामने डब्लीनच्याच ‘द विलेज’ मैदानावर खेळविले जाणार आहेत. या दौऱयासाठी हिंदुस्थानी संघात रिंकू सिंहसारख्या आयपीएल स्टारला संधी देण्यात आली आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून संघाबाहेर असलेला प्र्रसिध कृष्णाही पुन्हा संघात गोलंदाजी करताना दिसेल.

हिंदुस्थानचा टी-20 संघजसप्रीत बुमरा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन, शाहबाज अहमद, रवी बिष्णोई, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.