‘त्या’ लिंबूपाण्यात काविळीचे जंतू सापडले, कॅण्टीन चालकाला जबर दंड ठोठावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील कॅण्टीनच्या छतावरील कामगाराने कळकट मळकट हाताने ज्यूस बनविण्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. या ज्यूसचे नमुने पालिकेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असता त्यात काविळीचे जीवाणू सापडल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे या कॅण्टीन चालकावर मध्य रेल्वे आता कोणती दंडात्मक कारवाई करते हे पाहावे लागणार आहे.

रेल्वेची कॅण्टीन म्हटले की सर्वसाधारण लोक उकळलेल्या चहापलीकडे काही खाण्यास नाक मुरडतातच, परंतु उन्हाळय़ात निदान लिंबूपाण्याची तहान तरी भागवावी या आशेने अशा स्टॉलवर चाकरमान्यांची गर्दी उसळलेली असते. परंतु कुर्ला येथील हार्बर मार्गावरील 7 व 8 नंबरच्या स्थानकावरील पत्रे बदलण्याचे निमित्त झाले आणि लिंबू सरबताची रेसिपीच ‘व्हॉटस्ऍप’ प्रवाशांच्या मोबाईलवर प्रदर्शित झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या तोंडचे पाणीच पळाले. कुर्ला स्थानकाच्या हार्बरच्या 7 व 8 क्र. फलाटावरील एका कॅण्टीनमधला कामगार छतावरच ज्यूस बनविताना हॉटेलमधल्या बाऊलमध्ये हात धुतल्याप्रमाणे त्यातच आपले हात धूत असल्याचे  दिसल्याने चाकरमान्यांच्या पोटात मळमळ झाली. अखेर मध्य रेल्वेने संबंधित कॅण्टीनला ‘सील’ ठोकत धडक कारवाई केली.

लिंबू सरबताचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुर्ला स्थानकावरील तो स्टॉल बंद

पाच लाखांपर्यंतचा दंड

या कॅण्टीन चालकाच्या ज्यूसचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यात ई-कोलाय हा काविळीचा जीवाणू असल्याचे स्पष्ट झाले असून या  कंत्राटदाराची दंडात्मक तसेच कंत्राट रद्द करण्यापर्यंतची शिक्षा होऊ शकते असे म्हटले जात असले तरी त्याला पाच लाख रुपयांपर्यंत दंड फर्मावण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

वांद्रे रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर आढळला उंदीर, व्हिडीओ व्हायरल