शहीद झाल्यानंतरही ‘या’ जवानाची ठेवली जाते सीमेवर बडदास्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुवाहटी

जवान शहीद झाल्यानंतर त्याला सर्वोच्च सन्मानाने अलविदा केले जाते. मात्र हिंदुस्थानात एक असेही जवान आहेत जे शहीद झाल्यानंतरही त्यांची सीमेवर बडदास्त ठेवली जात आहे. जसवंत सिंह रावत असे त्या जवानाचे नाव असून ते 1962 च्या युद्धात शहीद झाले होते. मात्र तरीही रावत यांच्या चौकीवर आजही जवान त्यांची दिवसरात्र बडदास्त ठेवत असतात. जसवंत सिंह हे ज्या चौकीवर होते तिथे त्यांच्या नावाचे एक मंदिर बांधण्यात आले असून तेथे त्यांच्या वस्तू आजही जपून ठेवलेल्या आहेत. सकाळ संध्याकाळ तेथे त्यांना नाश्ता व जेवण दिले जाते. त्यांचा युनिफॉर्म इस्त्री व त्यांचे शूज पॉलिश करून ठेवले जातात. तसेच जसवंत सिंह हे शहीद झाले असले तरी त्यांच्या नावापुढे आजही शहीद लिहले जात नाही.

मूळचे उत्तराखंडचे असलेले जसवंत सिंह रावत हे 1962 च्या युद्धाच्यावेळी लष्करात रायफलमॅन या पदावर होते. त्यावेळी ते अरुणाचल प्रदेशमधील तवांगमधील नूरारंग येथे तैनात होते. त्यावेळी तवांगवर कब्जा करण्यासाठी चीनी सैनिक पुढे सरकत होते. हिंदुस्थानी सैनिकांची संख्या कमी असल्यामुळे तिथे तैनात गढवाल रायफल्सला लष्कर प्रमुखांनी लढा न देता मागे हटण्यास सांगितले होते. मात्र गढवाल रायफल्सचे प्रमुख असलेले जसवंत सिंह यांनी मागे हटण्यास नकार दिला. त्यांनी चीनवर हल्ला करण्यासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी हिंदुस्थानचे बंकर बनवले. त्यानंतर सलग 72 तास काही न खाता पिता गढवाल रायफल्सचे जवान लढा देत होते. या लढाईत जसवंत सिंह यांनी एकट्याने 200 हून अधिक चीनी जवानांचा खात्मा केल्याचे बोलले जाते. ते या युद्धात शहीद झाले मात्र त्यांच्या मृत्युच्या देखील अनेक आख्यायिका आहेत. कुणी म्हणतं चीनी सैनिकांनी जसवंत सिंह यांचे शिर कलम करून त्यांची हत्या केली तर कुणी म्हणतं की चीनी सैनिकांनी त्यांना फाशी दिली. काहींचं असंही म्हणनं आहे की चीनने युद्धकैदी बनवू नये म्हणून यशवंत सिंहांनी स्वत:वर गोळी झाडली होती. जसवंत सिंहांच्या लढ्यामुळे त्यावेळी तवांगवर कब्जा करायला आलेल्या चीनी सैनिकांना मागे फिरावे लागले होते. त्यानंतर हिंदुस्थान सरकारने त्यांना मरणोत्तर शौर्य पदक दिले होते. तसेच जसवंत सिंह अखेरचे ज्या चौकीवर होते त्या चौकीला आता जसवंतगढ असे नाव दिले होते.

मरणोत्तर मिळाले प्रमोशन, आजही जातात सुट्टीवर घरी
जसवंत सिंह यांना मरणानंतरही बढती मिळाली आहे. ते आता मेजर जनरलच्या पदावर आहेत. तसेच दरवर्षी इतर जवानांप्रमाणेच जसवंत सिंह देखील सुट्टीसाठी त्यांच्या घरी जातात. त्यावेळी त्या काही जवान जसवंत सिंह यांचा मंदिरात ठेवलेला फोटो त्यांच्या घरी नेतात व सुट्टी संपल्यानंतर पुन्हा घेऊन देखील येतात.