यू टयूबवर मूळ संचातील ‘जय जय गौरी शंकर’

मराठी संगीत रंगभूमीवरील मानाचे पान ठरलेले आणि ‘ललितकलादर्श’चे ‘संगीत जय जय गौरीशंकर’ हे मूळ नटसंचातील तीन अंकी नाटक येत्या 3 जानेवारी 2021 रोजी ’यू टय़ूब’वर सादर होणार आहे. या नाटकाचा पहिला अंक सकाळी 9 वाजता सादर होणार असून दुसरा आणि तिसरा अंक अनुक्रमे दुपारी 3 आणि रात्री 8.30 वाजता सादर होईल.

ज्येष्ठ पत्रकार-संपादक विद्याधर गोखले लिखित आणि नटवर्य मामा पेंडसे दिग्दर्शित या नाटकाचे निर्माते गायक-अभिनेते भालचंद्र पेंढारकर हे होते. मूळ नटसंचात पंडित राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, माया जाधव, जयश्री शेजवाडकर, चंदू डेगवेकर, सुकुमार, शहाजी काळे हे कलाकार होते.

नाटकाचे संगीत वसंत देसाई यांचे होते. तर संगीतसाथ पं.गोविंदराव पटवर्धन, पं.भोजराज साळवी, पं. मधुकर बर्वे यांची होती. भालचंद्र पेंढरकर यांचे जन्मशताब्दी वर्ष 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरू झाले आहे. या नाटकाचे लेखक- पत्रकार विद्याधर गोखले यांचा 4 जानेवारी हा जयंती दिन आहे. तसेच 54 वर्षांपूर्वी म्हणजे रविवार, 14 ऑगस्ट 1966 या दिवशी सकाळी 9, दुपारी 3 आणि रात्री 8.30 वाजता या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग सादर झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या