
आपल्या राज्यातील पाणी आपल्याच हातात आहे. त्यामुळे कोयना, वारणा आणि सातारा जिह्यातील धरणाची उंची वाढवा. त्याशिवाय कर्नाटक वठणीवर येणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी आज विधानसभेत घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेला हल्ला व सीमा प्रश्न जयंत पाटील यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला. सीमा भागात मराठी बांधवांचे संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील एकही नेता पोहोचणार नाही अशी व्यवस्था कर्नाटक सरकारने केली होती. हसन मुश्रीफ तेथे गेले असता त्यांच्यावर लाठी उगारली गेली. हे अत्यंत चुकीचे आहे, अशी खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
सीमा भागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातोय. आपण याचा जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारला ठणकावले. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम खपवून घेऊ नका, असे राज्य सरकारलाही त्यांनी सुनावले.
































































