
आम्ही पुन्हा येऊ यात काही शंका नाही. कधी येणार याचा मुहूर्त थोडय़ा दिवसांनी नक्कीच सांगू. आमचेच सरकार पुन्हा येणार. वेगळय़ा मार्गाने चाललेलं सरकार किती काळ टिकेल याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शंका आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
सांगली येथे पत्रकार परिषदेत जयंत पाटील म्हणाले, कुठल्याही राजकीय पक्षाने निवडणुकीला सामोरे न जाता तुम्ही फक्त निवडून यायचे. मग तुम्हाला ताब्यात घेऊ. त्याची काय किंमत असेल ती मोजू, अशी फॅशन देशात रूढ होण्याची शक्यता आहे. गावोगावी फिरा, प्रचार करा यापेक्षा सर्वांना निवडून येऊ द्यावं आणि त्यानंतर त्या सर्वांना गोळा करावं हाही नवा पायंडा पुढच्या दहा वर्षांत पडेल, असा टोला त्यांनी लगावला.
…तर लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील
निवडून आलेले अधिकृत पक्षातील लोक एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जात असतील ही काही प्रमाणात राजकीय आत्महत्याच आहे. घटनेतील 10व्या परिशिष्टानुसार अपात्रतेचा जो कायदा आहे त्याचे उल्लंघन 2/3 गट करण्याआधीच झाले आहे. गट करण्याआधीच त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू झाली आहे. दहाव्या परिशिष्टानुसार न्यायालयाने निर्णय दिला तर लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास राहील, असे जयंत पाटील म्हणाले.
फुटीर गटातील मतभेद मिटवणे, त्यांच्यात समजूत घालणे यातच मुख्यमंत्र्यांचा वेळ जातोय
एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन 25 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या वेळात केवळ दिल्लीवाऱया करणे, शिवसेनेच्या फुटीर गटातील मतभेद मिटवणे, त्यांच्या समजुती घालणे यात मुख्यमंत्र्यांचा वेळ जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घ्यावे लागल्याने भाजप निराश असल्याने त्यांना राज्यातील 92 नगरपालिका आणि चार नगर पंचायतींमधील ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यास नव्या सरकारला वेळ मिळाला नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.


























































