जयंत पेडणेकर यांना सर्वोत्कृष्ट सिने स्टील छायाचित्रकार पुरस्कार

Jayant Pednekar

प्यार किया तो डरना क्या, हॅलो ब्रदर, मनचला, सरफरोश, गॉडफादर, पहेली, खेल अशा अनेक हिंदी सिनेमांसाठी स्टील फोटोग्राफी करणारे बॉलीवूडचे ज्येष्ठ मराठमोळे छायाचित्रकार जयंत पेडणेकर यांना सर्वोत्कृष्ट सिने स्टील छायाचित्रकार या पुरस्काराने गौरविण्यात आले. हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 156व्या जयंतीनिमित्त फाळके फाउंडेशनने पेडणेकर यांचा गौरव केला.

सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱया कलावंतांना दादासाहेब फाळके फाउंडेशनच्या वतीने गौरविण्यात येते. यंदाचा गौरव सोहळा विलेपार्ले येथील मुकेश पटेल सभागृहात पार पडला. या सोहळ्यात यंदाचा सर्वोत्कृष्ट सिने स्टील छायाचित्रकार हा पुरस्कार जयंत पेडणेकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जातो.

जयंत पेडणेकर हे 1987 पासून सिने स्टील छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट तसेच परदेशी चित्रपटांसाठी छायाचित्रकार म्हणून काम पाहिले आहे.