
राज्यात महानगरपालिकेच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना अंबरनाथ आणि अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी काँग्रेस, एमआयएमशी युती केल्याचे समोर आले. यावर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही याचा उल्लेख करत भाजपवर तोफ डागली. भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. ते सांगलीत बोलत होते.
आज भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली असून मास्तराला तमाशाचा इतका नाद लागला की मास्तरच तुणतुणे हातात घेऊन पुढे उभा राहायला लागला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ‘ये बंद करने आए थे तवायफोके कोठे, मगर सिक्को की खणक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे’, अशा शेरोशायरीतून जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.
भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी वेगवेगळ्या आघाड्या करून सत्ता बनवण्याचे नाकारल्याचे उदारहण आहे, मात्र आज भाजपने काँग्रेसमधील सगळे ओढून आपल्या पक्षात नेले, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. तसेच आम्ही हिंदुत्ववादी आहोत असे भाजपवाले सांगतात, आणि अकोल्यात एमआयएमसोबत युती करतात. ओवेसीच्या मांडीला मांडी लावून बसतात. यांचे खायचे दात वेगळे आहेत. सत्तेसाठी कुणाशाही आघाडी करायला भाजपला काही वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजप आता काँग्रेसयुक्त झालाय, असा टोलाही त्यांनी लगावला.






























































