ही दोस्ती तुटायची नाय! क्षीरसागरांच्या शिवसेना प्रवेशानंतर सोशल मीडियावर पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गेवराई

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याबद्दल गेवराईत शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी त्यांचा आपल्या निवासस्थानी हृदयसत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. क्षीरसागर यांच्या प्रवेशानंतर “आबा व आण्णाची ही धडाकेबाज दोस्ती तुटायची नाय ” अशा पोस्ट सोशल मिडीया वरुन झळकू लागल्या आहेत. गेल्या 30 वर्षापासून या दोघांची राजकीय भूमिका कायम आहे.

बीड जिल्ह्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांची घट्ट मैत्री सर्वांनाच परिचित आहे. दोन वर्षांपूर्वी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीसह ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी घवघवीत यश मिळविले. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी केंद्रात आणि राज्यात शिवसेनेची भाजपासोबत पुन्हा युती झाली. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडील आमदारकीचा राजीनामा दिला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या शिवसेना प्रवेशानंतर पहिल्यांदाच गेवराईत आलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी आपल्या निवासस्थानी हृदयसत्कार करून, त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

बदामराव पंडित यांनी आपल्या राजकारणाला सन 1993 साली सुरुवात केली, पंडितांच्या भाऊबंदकीत त्यावेळी मोठे महाभारत घडले होते. बदामरावांना या सामाजीक व राजकीय लढ्यात बीडच्या दिंवगत नेत्या खा. केशरबाई क्षीरसागर व जयदत्त क्षीरसागर यांनी भक्कम साथ दिली. बदामराव 1995 ला विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणुन निवडून गेले. त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपाचे गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पांठीबा दिला. बदामरावांचा युती सरकारने राज्यमंत्री म्हणुन ग्रामीण विकास खात्यात समावेश केला. 1999 ला त्यांना युती पुरस्कृत उमेदवारी मिळाली, दुस-यांदा ते विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय प्राप्त केला. बदामरावांनी या मतदार संघातुन तीन वेळा विजय मिळवला व मतदार संघाची नेतृत्व केले. मात्र 26 वर्षाच्या कालखंडात त्यांचे व क्षीरसागर कुटुंबीयांशी सलोख्याचे संबंध राहीले. बदामरावांचा दोन वर्षापुर्वी शिवसेनेत प्रवेश झाला. नुकताच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला, या अनुषंगाने बदामराव (आबा) व जयदत्त क्षीरसागर (अण्णा) यांची दोस्ती तुटायची नाय अशा पोस्ट सोशल मिडीया वरुन साभार झाल्यानंतर या मैञीत दोघांच्या शिवसेना प्रवेशाने दुधात साखर पडली आहे,