
सामना प्रतिनिधी । बीड
मराठवाड्यात दुष्काळ पाचवीला पुजलेला असताना एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ व्हावा, यासाठी अभिनव प्रयोग करून शेतकऱ्यांना नेमके काय हवे ते करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, असे राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले. बीड जिल्ह्यात दहा हजार वैयक्तीक लाभाच्या विहिरी मंजूर करून बीड आणि नांदेड या ठिकाणी सिताफळ प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. रोजगार हमी योजना व फलोत्पादन विभाग यांच्या वतीने बीड शहरातील मोंढा रोड भागात वैष्णोदेवी पॅलेसमध्ये फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
शेततळे, ठिबक सिंचन व रोहयोच्या कामाची माहिती जाणून घेण्यासाठी हजारो शेतकरी यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेचे उद्घाटन बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. जयदत्त क्षीरसागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, पाणंद रस्ता ते रेल्वे मार्ग अशा बीड जिल्ह्याच्या सर्वच मागण्यांना शासन दरबारी झुकते माप मिळाले आहे. मी आणि जयदत्त क्षीरसागर आम्ही दोघे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कधीही मागे हटणार नाही. मी शेतकरी नसले तरी शेतकऱ्यांशी जवळचे नाते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. बीड जिल्ह्यात जलसंधारण आणि कृषी विभागाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. ग्रामीण भागातील माऊलींच्या डोक्यावरची घागर खाली उतरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे असे सांगून त्यांनी बीड हा विकासाकडे जात असलेला जिल्हा असून कमी पाण्यावर चांगली शेती करणारा शेतकरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, निसर्गाची किमयाच न्यारी आहे. एकीकडे भरभरून देतो तर एकीकडे पाठ फिरवतो. तिकडे पाण्याने जीव जात आहेत तर इकडे पाण्याविना जीव जात आहे अशा परिस्थितीत काही ठोस कामे घेऊन मदत करण्याच्या उद्देशाने अभिनव प्रयोग करून शेतकऱ्यांना नेमके काय हवे यासाठीचा प्रयत्न करत आहोत. राज्यावर पाण्याचे संकट असताना मराठवाडा कोरडा आहे. या मराठवाड्याची तहान भागण्यासाठी पुढचा विचार करून हे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी आपले प्रयत्न चालू आहेत. मागेल त्याला शेततळे ही सरकारची जाहीर झालेली योजना आहे. आस्तरीकरण असेल, ठिबक सिंचन असेल ही कामे ऑनलाईन न करता शेतकऱ्याच्या एका अर्जावर ती मंजूर करावीत असा आदेशच त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. ग्रामसभेत केलेल्या सर्व मागण्या तातडीने मंजूर करा, प्रत्यक्ष काम केले तर शासन कुठेही कमी पडणार नाही असे सांगून त्यांनी बीड जिल्ह्यात वैयक्तीक लाभाच्या दहा हजार विहिरी मंजूर करणार असून बुडीत क्षेत्रात 300 विहिरी करण्याचा मानस असल्याचे सांगीतले. बीड जिल्ह्यात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी काजू प्रक्रिया उद्योग आणि नांदेड व बीड या ठिकाणी सिताफळ प्रक्रिया उद्योग सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळ व अडचणीत असताना शासनाच्या योजनामुळे जर रोजगार निर्मिती होत असेल तर त्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे ते म्हणाले. यावेळी विविध विभागाच्या तज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले. तब्बल सहा तास कार्यशाळा सुरू होती. जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार भीमराव धोंडे, आर.टी.देशमुख, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, मनरेगा आयुक्त एस.आर.नायर, संचालक फलोत्पादन विभाग पी.एन.पोकळे, प्रभारी जिल्हाधिकारी प्रविण धरमकर, संचालक निकम, मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार, प्रतापसिंह कदम, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक व विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.






























































