धनुष्य बाण हाच रामबाण उपाय आहे म्हणून मला साथ द्या – जयदत्त क्षीरसागर

965

गेल्या 30 वर्षापासून मी राजकारण करत असताना कोणताही दुजाभाव करत राजकारण केलं नाही. दोन समाजात तेढ होईल असं केलं नाही. सर्वांना समान धरत राजकारण केलं. विरोधकांची ही बेगडी रूपं असून ती तात्पुरती आहेत. ते रडतील पडतील पण त्यांच्या या रूपाला थारा देऊ नका. आता धनुष्यबाण हा रामबाण उपाय असून येणाऱ्या 21 तारखेला धनुष्यबाण दाबा अन् साथ द्या अशी साद घालत बीडचे महायुतीचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

जयदत्त क्षीरसागर हे आपल्या प्रचार सभेदरम्यान रायमोहात बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आ.सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले की दुर्दैवाने पावसाचा महापूर बीडमध्ये नाही आला पण माणसांचा महापूर पंकजातार्इंच्या दसरा मेळाव्याला आला होता. घर फोडल्याने कुणाची घरं बांधली जात नाहीत. असं म्हणत क्षीरसागर यांनी पवारांवर देखील निशाणा साधला. पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्राच्या आणि राज्याच्या योजना अधिक गतिमान करायच्या असतील तर महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. पाच वर्ष इमानदारीने तुमची चाकरी केली आहे. तुमचा विश्वास सार्थ ठरवला आहे. पुन्हा एक संधी द्या, पुढचे पाच वर्षे इमाने इतबारे तुमची चाकरी करणार आहे. आता मी नवीन चिन्ह घेऊन आलोय. शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे लक्षात ठेवा. त्यामुळे येणाऱ्या 21 तारखेला रामबाण असलेल्या धनुष्यबान चिन्हा समोरील बटन दाबून साथ द्या अशीच साद रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी घातली़

 

आपली प्रतिक्रिया द्या