
बीड येथे शिवसेना महिला कार्यकारणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यावेळी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित महिलांना आवाहन केले. ते म्हणाले की, महिलांची शक्ती क्रांती घडवू शकते, हे आपण इतिहासामध्ये डोकावले तर स्पष्ट होईल. आजच्या महिलांमध्ये जागृती वाढली आहे. महिला अधिक सक्षम होत आहेत. आता महाराष्ट्रात आणि बीडमध्ये इतिहास घडवायचा आहे. त्यासाठी महिलांना ही हातात धनुष्य घ्यावे लागेल. एक भाऊ म्हणून मी तुमच्या कायम पाठीशी आहे आणि राहीन, असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या मेळाव्यात उपस्थित महिलांना दिला.
या वेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, डॉ भारतभूषण क्षीरसागर, दिपा क्षीरसागर, संगीता चव्हाण, आयोजक सारिका क्षीरसागर व्यासपीठावर उपस्थित होत्या. या वेळी जयदत्त क्षीरसागर बोलताना पुढे म्हणाले, सणांचे दिवस असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती पाहता शिवसेनेला व्यापक रूप मिळत आहे. महिला ही संसाराचे एक चाक आहे, संसाराचा गाडा ओढण्यासाठी महिला बचत गट सक्षम होणे गरजेचे आहे. म्हणूनच बीडमध्ये शिवसेनेच्या वतीने महिला बचत गटांना शासनाच्या माध्यमातून मदत देण्याचे काम सुरू आहे. माझे मंत्रीपद कशासाठी तर जनतेच्या हितासाठी आहे. गोरगरीब जनता हाच शिवसेनेचे कायम केंद्रबिंदू राहिला आहे, असं क्षीरसागर यावेळी म्हणाले.
बीड शहरातील आगामी विकासाचा आढावा घेताना क्षीरसागर म्हणाले की, बीड शहरात जनतेच्या आरोग्यासाठी 300 खाटांचे शासकीय रुग्णालय लवकर उभे राहत आहे. शहर वासीयांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. सध्या बीड जिल्हा दुष्काळाचा सामना करत आहे. निसर्गाची अवकृपा होत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होईल. त्यासाठी आपण समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत. तुमच्या समस्या या माझ्या समस्या असतील. एक भाऊ म्हणून मी कायम तुमच्या पाठीशी आहे आणि राहीन. महिला आता जागृत झाल्या आहेत, महिलांची शक्ती क्रांती घडवू शकते, परिस्थिती बदलण्यासाठी आता महिलांनी ही धनुष्य हातात घ्यायचा आहे असे आवाहन त्यांनी केले.





























































