
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बिहारमध्ये लोकसभेच्या ४०जागासाठी असणारा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जेडी(यु) आणि भाजपची युती किती टिकेल असा प्रश्नही निर्माण झाला आहे. जेडी(यु)चे नेते संजय सिंह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाआघाडीतील एक घटक पक्ष असलेले आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी नितीश कुमारांना ऑफर देऊ केली आहे. मात्र त्यासाठी एक अटही ठेवली आहे.
जेडी(यु)ला हात देण्यासाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री व हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे जीतन राम मांझी पुढे सरसावले आहे. पण, नितिश कुमार हे मुख्यमंत्रीपद इतर पक्षांसाठी खुले करत असतील, तरच आपण युती करू अशी अट त्यांनी यावेळी घातली. जर असे झाले तर, २०२० मध्ये बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी प्रसादच असतील असेही जाहीर केले.
दरम्यान, सोमवारी जेडी(यु)चे नेते संजय सिंह यांनी भाजपाला थेट इशारा दिला होता. भाजपला मित्रपक्षांची गरज नसल्यास त्यांनी लोकसभेच्या ४० जागांवर स्वबळावर लढावं, पण नितीश कुमारांच्या सोबतीशिवाय भाजपला सत्ता मिळवणं कठीण असेल, असंही ते म्हणाले होते.





























































