जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या जेईई मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत देशभरातील 23 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 एनटीए गुण मिळविले आहेत. यात सर्वाधिक 7 विद्यार्थी तेलंगणा राज्यातील असून महाराष्ट्रातील आर्यन प्रकाश, नीलकृष्णा गजारे आणि दक्षेक्ष मिश्रा या तीन विद्यार्थ्यांनी 100 एनटीए गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील बीई, बीटेक परीक्षेसाठी 12 लाख 21 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 11 लाख 70 हजार 40 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. आता दुसरे सत्र एप्रिलमध्ये नियोजित आहे. 100 गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांमध्ये हरयाणा, दिल्लीतील प्रत्येकी 2, राजस्थान, आंध्र प्रदेशमधील 3, गुजरात, तामीळनाडू, कर्नाटकातील प्रत्येकी 1 विद्यार्थ्याचा समावेश आहे, तर दोघा विद्यार्थ्यांचा निकाल एनटीएने अद्याप जाहीर केलेला नाही. जेईई मेन पेपर 1 आणि पेपर 2 च्या निकालांच्या आधारे जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. हे विद्यार्थी देशातील प्रमुख आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असतील.