टीबीचे उच्चाटन करण्यासाठी 13 शहरांमध्ये जीत प्रकल्प राबवणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

टीबीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच अधिकाधिक क्षयरुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘जीत’ प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. राज्यात 13 शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असून या उपक्रमात खासगी तसेच शासकीय रुग्णालयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस येथे ‘जीत’ या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. यावेळी ‘रिवाइज्ड नॅशनल टय़ुबर्क्युलोसिस कंट्रोल प्रोग्रॅम’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. केंद्र शासनाच्या मध्यवर्ती क्षयरोग विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे की, 60 टक्के क्षयरुग्ण खासगी क्षेत्रात उपचार घेतात. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे उपचार घेणाऱया अशा क्षयरुग्णांची माहिती जमा करून त्यांना वेळेत आणि संपूर्ण उपचार मिळण्यासाठी ‘जीत’ प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आरोग्यसेवा आयुक्त अनुपकुमार यादव, आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे आदींसह विभागातील अधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या शहरांत राबवणार प्रकल्प
संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, रायगड, सोलापूर, ठाणे, विरार, वसई-भाईंदर, डोंबिवली आणि भिवंडी या शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत 23 जिह्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.