जेफ बेजोस यांच्या ब्ल्यू ओरिजिनलने रचला इतिहास, अंतराळ प्रवासाची व्याख्या बदलणार

ब्रिटनचे उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या वर्जिन स्पेस प्लेननंतर आता जगातील सर्वाधिक धनाढय़ व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ब्ल्यू ओरिजनल कंपनीच्या स्पेस प्लेनने तब्बल 106 किलोमीटर अंतराळापर्यंत पोहोचून अंतराळात 11 मिनिटे घालवली. त्यानंतर ही तबकडी (स्पेस कॅप्सुल) सुरक्षितपणे जमिनीवर परतली. पहिल्या विनापायलट मोहिमेत स्वतः जेफ बेजोस, सर्वात तरुण व्यक्ती आणि बेजोस यांचा भाऊ मार्क (18), सर्वात वृद्ध व्यक्ती वॅली फंक (82) आणि ऑलिव्हर डेमेन सहभागी झाले होते. सर्वसामान्य व्यक्तीचा या अंतराळ सफरीत समावेश असल्यामुळे अंतराळ प्रवासाची व्याख्या आता बदलणार आहे.

टेक्सासच्या वाळवंटी भागातील केंद्रावरून हिंदुस्थानच्या वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी ब्ल्यू ओरिजिनलच्या न्यू शेफर्ड रॉकेटने बेजोससह 4 प्रवाशांसह अंतराळात झेप घेतली. रॉकेटने ते अवकाळात 106 किलोमीटर गेले आणि त्यांची तबकडी तब्बल 11 मिनिटे अवकाशात होती. त्यानंतर ही तबकडी सुरक्षितपणे जमिनीवर उतरली. अंतराळातून सुरक्षित प्रवास करून खाली उतरल्यानंतर बेजोस यांनी आनंद व्यक्त केला. 1969 साली अपोलो-11 या यानातून याच दिवशी नील आर्मस्ट्राँग आणि बस एल्ड्रिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. त्यामुळे हाच दिवस अंतराळ प्रवास आणि पर्यटनासाठी निवडला, असे बेजोस यांनी सांगितले.

  • जगातील पहिली विनापायलट मोहीम ज्यात सर्वसामान्य व्यक्ती सहभागी होती.
  • सर्वात तरुण आणि सर्वात वृद्ध व्यक्तीचा समावेश
  • अवकाशात नेणाऱया रॉकेट आणि तबकडी (स्पेस कॅप्सूल)चा पुनर्वापर करता येणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या