जेऊर-कोंढेज मार्गावरील पुलाची ऐन पावसाळ्यात दुरुस्ती, चार गावांचा जेऊरशी संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर जेऊर-कोंढेज या मार्गावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे करमाळा बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. काम सुरू असताना दहिगाव योजनेचे पाणी वेगाने आल्यामुळे कोंढेजसह वरकटणे, सौंदे, शेलगाव या गावांचा जेऊरशी संपर्क तुटला आहे. जेऊरला बाजारपेठ, रेल्वेस्थानक आणि हॉस्पिटल असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

गेल्या वर्षापासून या पुलासाठी निधी मंजूर असताना ठेकेदाराकडून होत असलेल्या दिरंगाईला सार्वजनिक बांधकाम विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात या पुलाच्या वरच्या बाजूला असलेल्या जेऊर लव्हे पुलावरून चारचाकी वाहून गेल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला होता. तसेच जेऊर-कोंढेज मार्गावरील पुलाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने अतिवृष्टीत नुकसान झालेले रस्ते, पूल यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार लव्हे पुलाच्या दुरुस्तीसाठी सात लाख, तर कोंढेज मार्गावरील पुलासाठी 35 लाख मंजूर झाले होते. लव्हे पुलावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली, तर कोंढेज मार्गावरील पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध असूनही काम रेंगाळले होते.

युवा सेनेने उठवला होता आवाज

– निधी उपलब्ध असतानादेखील पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे युवासेनेच्या वतीने आवाज उठविण्यात आला होता. यावेळी पुलाचे काम तत्काळ सुरू करण्याचे आश्वासन करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता उबाळे यांनी दिले होते, अशी माहिती युवासेनेचे शंभुराजे फरतडे यांनी दिली. आता ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर हे काम सुरू करण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.