
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा अपेक्षाभंग पदरी पाडून घेतलेल्या भाजपला झारखंडच्या विधानसभा निवडणुकीतही मोठा झटका बसणार आहे. शनिवारी पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या 13 जागांपैकी निम्म्याहून अधिक जागा भाजपला गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक झालेले मतदान हे सत्ताधारी भाजपला धडा शिकवण्यासाठीच मतदारांनी उचलले पाऊल मानले जात आहे.
विधानसभेच्या 81 जागांसाठी पाच टप्प्यांत मतदान होत आहे. शनिवारी पहिल्या टप्प्यात 13 जागांसाठी मतदान झाले. त्यातील 11 मतदारसंघांतील मतदानाचा टक्का लोकसभा निवडणुकीपेक्षाही अधिक आहे. नक्षलग्रस्त लोहरदगा विभागात 71.47 टक्के मतदान झाले. मतदानाचे वाढलेले प्रमाण लोकशाहीसाठी चांगले संकेत असले तरी सत्ताधारी भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यावरून वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपला 11 जागांवर फटका बसू शकतो. दीर्घकाळापासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या चतरा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच 56.59 टक्के मतदान झाले.
विरोधकांचे तगडे आव्हान
राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. सुदेश महतो यांची आजसू पार्टी युतीमधून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधात त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री राहिलेले सरयू राय यांनी दंड थोपटले आहेत. तसेच जेएमएम, काँग्रेस आणि राजद हे विरोधी पक्ष एकत्र येऊन रिंगणात उतरले आहेत.
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक लागली होती. त्यावेळी भाजपाने ज्या सहा जागा जिंकल्या होत्या त्या मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱया पक्षांनी वर्चस्व मिळवले आहे.






























































